What RSS Chief Mohan Bhagwat Says : झारखंडमधील गुमला येथे एका ग्रामीण स्तरावरील कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात (दि. १८ जुलै) मार्गदर्शन करत असताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मानवाच्या महत्त्वाकांक्षेबाबत भाष्य केले. “काही लोक आधी सुपरमॅन (महापुरुष), त्यानंतर पूजनीय आणि पूजनीय नंतर देव बनू पाहत आहेत”, भागवत यांनी असे विधान केल्यानंतर काँग्रेसने या विधानाला उचलून धरले आहे. काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी मोहन भागवत यांच्या विधानाचा व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान मोदी यांच्यावर खोचक टीका केली.
मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
झारखंडमधील कार्यक्रमात बोलत असताना भागवत म्हणाले, “जेवढा विकास करण्याचा विचार केला होता, तिथवर आपण पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर दिसते की, यापुढेही बरेच काही करण्यासारखे आहे. पण ज्या माणसात माणुसकी नाही, त्याने आधी माणूस बनावे. पण काही लोक विकासाच्या निर्धारीत टप्प्यावर पोहोचल्यावर मानवाचे सुपरमॅन बनू पाहतात. सुपरमॅन बनल्यावरही ते थांबत नाहीत, त्यांना वाटते आता पूजनीय बनायला हवे. पण पूजनीय म्हणतात आमच्यापेक्षा देव मोठे, तर देव म्हणतो माझ्यापेक्षा विश्वरुप मोठे. आता विश्वरुपाच्या पुढेही काही आहे का? हे कुणाला माहीत नाही. विकासाचा काही अंत नाही. ही निरंतर चालत राहणारी प्रक्रिया आहे.”
‘‘गेल्या २००० वर्षांत वेगवेगळे प्रयोग केले गेले, पण ते भारताच्या पारंपरिक जीवन पद्धतीत रुजलेले आनंद आणि शांती देण्यात अयशस्वी ठरले. करोनानंतर जगाला कळले की भारताकडे शांती आणि आनंदाचा रोडमॅप आहे, असे भागवत म्हणाले. ‘विकास भारती’ या ना-नफा संस्थेने आयोजित केलेल्या ग्रामस्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत सरसंघचालक बोलत होते.
हे वाचा >> करोनानंतर जगाला कळले, भारताकडे शांतता, आनंदाचा मार्ग; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत
कोणतेही काम कधीच संपत नाही
मोहन भागवत पुढे म्हणाले, विकासाचा काही अंत नसतो. तुम्ही काही झाडे लावली. पण झाड लावणे, हे सुरूच राहिले पाहीजे. सर्वांना शिक्षण दिले, पण नवी पिढी येईल, तिलाही शिक्षण मिळाले पाहिजे, शिक्षण निरंतर चालत राहिले पाहिजे. आरोग्याचा प्रश्न असेल, यात सातत्याने काम करत राहिले तरच समाधान मिळू शकेल.
काँग्रेसची पंतप्रधान मोदींवर टीका
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या या विधानानंतर काँग्रेसचे सरचिटणीस खासदार जयराम रमेश म्हणाले, “स्वयंभू नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधानांना या ताज्या अग्नी क्षेपणास्त्राची माहिती मिळालीच असेल, असा मला विश्वास वाटतो. नागपूरने (भागवत) झारखंडहून लोक कल्याण मार्गावर (पंतप्रधान निवास) निशाणा साधला आहे.”
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानानंतर सोशल मीडियावरही याबाबतची चर्चा रंगली आहे. अनेकजण या विधानाला पंतप्रधानांच्या जुन्या विधानाशी जोडून पाहत आहेत. काँग्रेस प्रवक्त्या रितू चौधरी म्हणाल्या की, मोहन भागवत कुणाला ट्रोल करत आहेत? कदाचित त्यांचा इशारा आपल्या नॉन-बायोलॉजिकल पंतप्रधानांकडे तर नाही ना?