Rahul Gandhi Rajnath Singh in Parliament: यंदाचं संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासूनच सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. गौतम अदाणींच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं असून त्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज संसदेबाहेर विरोधकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं. स्वत: लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेबाहेर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना आंदोलनाचं प्रतीक म्हणून हाती तिरंगा देण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रध्वज आणि गुलाब!
याआधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेबाहेर आंदोलन करताना कधी मुखवटे, कधी टीशर्ट तर कधी घोषणा लिहिलेल्या बॅग या माध्यमातून आपला निषेध नोंदवला. यंदा मात्र काँग्रेसच्या खासदारांनी भाजपाच्या खासदारांना संसदेच्या बाहेर थेट तिरंगा आणि गुलाबाचं वाटप केलं. खुद्द देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह संसद परिसरात आले असता त्यांना राहुल गांधी यांनी तिरंगा देण्याचा प्रयत्न केला. फुलं आणि तिरंगा देण्याबरोबरच ‘देश को मत बिकने देना’ असं लिहिलेले फलकदेखील विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद परिसरात आणले होते.
“आम्ही त्या सगळ्यांना राष्ट्रध्वज आणि गुलाबाचं फूल दिलं आहे. त्यांना आम्ही विनंती केली आहे की देश विकण्याऐवजी तो पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करा. पण दुर्दैवाने आपण पाहिलं आहे की हा देश सध्या अदाणीच चालवत आहेत. सगळंकाही त्यांच्या हाती सोपवलं जात आहे. गरीबांचा आवाज दाबला जात आहे. आम्ही देश विकण्याच्या या कटाच्या विरोधात आहोत”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली.
पहिल्या दिवशी मुखवटा, दुसऱ्या दिवशी बॅग, आज झेंडा
अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी व अदाणींचे मुखवटे घातलेल्या दोन खासदारांची मिश्किल शब्दांत जाहीर मुलाखत घेतली. दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गौतम अदाणी यांचे उल्लेख असलेल्या बॅग विरोधी पक्षाच्या खासदारांनी आवारात दाखवल्या. आता गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज सत्ताधारी आमदारांना देऊन विरोधक निषेध नोंदवत आहेत.
निशिकांत दुबे यांच्या विधानावरून वादंग
दरम्यान, भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी गांधी कुटुंब आणि अमेरिकास्थित अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचा संपर्क असल्याचा दावा करणारं विधान केलं होतं. हे आरोप करणारं विधान कामकाजातून काढून टाकण्यात यावं, अशी मागणी काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांनी केली. त्यांनी सभागृहाचं कामकाज व्यवस्थित चालू द्यावं, अशी मागणी करणारं पत्रदेखील लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिलं.