काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचा वाढदिवस नुकताच झाला. भारत जोडो यात्रा असो किंवा सभा असो राहुल गांधी हे अनेकदा पांढऱ्या टी शर्टमध्ये वावरताना दिसले आहेत. बहुतांश वेळा ते झब्बा किंवा इतर कुठला वेश परिधान करण्याऐवजी पांढरा टी शर्ट घालतात. अगदी इंडिया आघाडीची जी पत्रकार परिषद निकालानंतर पार पडली त्यातही त्यांनी पांढरा टी शर्ट घातला होता. पांढरा टी शर्ट का आवडतो? याचं उत्तर राहुल गांधींनीच दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे राहुल गांधींनी?

राहुल गांधींनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओत त्यांनी पांढरा टी शर्ट घालण्याचं कारण सांगितलं आहे. “तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी सर्वांचे मनापासून आभार”, असं म्हणत राहुल गांधी यांनी व्हिडीओमधून सर्वांचे आभार मानले. तसेच, पुढे बोलताना राहुल गांधी म्हणतात, “मला अनेकदा विचारलं जातं की, मी नेहमी पांढरा टी-शर्ट का घालतो? तर त्यामागे एक खास कारण आहे. पांढरा टी-शर्ट माझ्यासाठी पारदर्शकता, दृढनिश्चय आणि साधेपणाचे प्रतीक आहे. ही मूल्यं तुमच्या आयुष्यात कुठे आणि किती उपयुक्त आहेत? मला #WhiteTshirtArmy वापरून व्हिडीओमध्ये सांगा. मी तुम्हाला एक पांढरा टी-शर्ट भेट म्हणून देईन.” असं खास आवाहन राहुल गांधींनी केलं आहे.

हे पण वाचा- प्रियांकांसाठी राहुल गांधींनी वायनाड का सोडलं? काय आहे कारण?

एनडीए सरकार कमकुवत, राहुल गांधींची टीका

सत्ताधारी एनडीए संख्याबळाच्या बाबतीत खूपच कमकुवत असून, थोड्याशा गडबडीने सरकार कोसळू शकते, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. फायनान्शिअल टाईम्स वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राहुल यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘संख्या इतकी कमी आहे की सरकार खूप नाजूक आहे आणि अगदी लहान गडबड देखील ते खाली आणू शकते. मुळात एका (एनडीए) मित्रपक्षाला दुसरीकडे वळावे लागेल. एनडीएचे काही सहकारी ‘आमच्या संपर्कात आहेत’, असा दावाही त्यांनी केला. पण कोण? राहुल यांनी कोणाचेही नाव उघड केले नाही, मात्र मोदी गोटात ‘असहमती’ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधींना राजकीय नेत्यांनी दिल्या शुभेच्छा

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बुधवारी राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर अखिलेश यादव यांचे आभार मानताना राहुल गांधी म्हणाले की, अखिलेशजी तुमच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद. यूपीतील दोन मुलं भारतीय राजकारणात प्रेमाचं दुकान उघडतील. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांनीही राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच तेजस्वी यादव यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mp rahul gandhi always wear white t shirt he reveals reason in video scj
Show comments