राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ साली साताऱ्यात मुसळधार पावसात केलेल्या भाषणाच्या आठवणी आजही ताज्या आहेत. २०१९ मधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीआधी पवारांनी धो-धो पावसात राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना निवडून आणण्याची साद मतदारांना घातली होती. त्यानंतर जे घडलं ते अवघ्या महाराष्ट्रानं अनुभवलं. या घटनेच्या तीन वर्षांनंतर काँग्रेस खासदार राहुल गांधींनी मुसळधार बरसणारा पाऊस अंगावर झेलत कर्नाटकाच्या म्हैसुरमध्ये भाषण केलं. त्यांच्या या सभेचा व्हिडीओ काँग्रेसने ट्विटरवर पोस्ट केला आहे.
Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या ‘पराठ्या’वरून काँग्रेस आणि सीपीएममध्ये रंगला वाद
कुठलाही अडथळा ‘भारत जोडो’ यात्रेला लक्ष्य गाठण्यापासून रोखू शकत नाही, असे कॅप्शन या पोस्टला देण्यात आले आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू आहे. कन्याकुमारीतून सुरू झालेल्या या यात्रेचा मुक्काम सध्या कर्नाटकात आहे. “भारताला एकजूट करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. भारताचा आवाज उठवण्यापासून आम्हाला कोणीही थांबवू शकत नाही”, असा संदेश या पोस्टद्वारे काँग्रेसने दिला आहे.
काँग्रेसने कन्याकुमारीतून साडेतीन हजार किलोमीटरची पदयात्रा सुरू केली आहे. महागाई, बेरोजगारी तसेच जीएसटीमुळे देशात निर्माण झालेल्या आर्थिक विषमतेकडे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसकडून ही यात्रा करण्यात येत आहे. केंद्र सरकारविरोधात देशातील जनतेला संघटित करणे, या पदयात्रेचे लक्ष्य आहे.