उत्तर प्रदेशातल्या हाथरस या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ लोकांचा मृत्यू झाला. भोलेबाबांच्या सत्संगासाठी लोक जमले होते. त्यावेळी ही घटना घडली. या घटनेतल्या पीडितांची भेट राहुल गांधींनी घेतली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलीगढ या ठिकाणी जाऊन दोन कुटुंबांचं सांत्वन केलं आणि मदतीचं आश्वासनही दिलं आहे.

राहुल गांधी पीडितांच्या भेटीला

राहुल गांधी शुक्रवारी सकाळी पिलखाना या गावात पोहचले. तिथे त्यांनी प्रेमवती आणि शांतीदेवी यांच्या मुलाची भेट घेतली. राहुल गांधी पिलखाना गावातल्या त्या दोन घरांमध्ये पोहचले होते त्या कुटुंबाने हाथरस दुर्घटनेत त्यांची माणसं गमावली. या कुटुंबातले काही लोक त्या चेंगराचेंगरीत मारले गेले.

राहुल गांधींकडून कुटुंबाचं केलं सांत्वन

अलीगढ येथील पीडित कुटुंबाच्या सदस्यांनी हे सांगितलं की आम्हाला राहुल गांधींनी मदतीचं आश्वासन दिलं. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठिशी आहे आम्ही तुम्हाला मदत करु असं ते आम्हाला म्हणाले. तसंच आम्हाला त्यांनी सत्संगाच्या दिवशी नेमकं काय घडलं? चेंगराचेंगरी कशी झाली? त्याबाबत माहिती दिली आहे. असंही या कुटुंबातल्या सदस्यांनी सांगितलं. अलीगढमधल्या या कुटुंबांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी हाथरसला गेले. तिथे त्यांनी तीन कुटुंबांची भेट घेतली. हाथरसच्या दुर्घटनेत मुन्नी देवी आणि आशा देवी या दोघींचा जीव गेला. तर मायादेवी जखमी झाल्या. या सगळ्यांच्या कुटुंबांची भेट राहुल गांधींनी घेतली. त्यांचं सांत्वन केलं. मुन्नी देवी आणि आशादेवी या दोघीही हाथरसच्या नवीपूर खुर्द येथील रहिवासी होत्या. राहुल गांधी आल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

हे पण वाचा- Hathras Stampede : “मृतांना जिवंत करणार अन् आजारांना पळवणार”, भोले बाबांबाबत अनुयायांनी केलेले दावे चर्चेत!

उत्तर प्रदेशातल्या हाथरस या ठिकाणी आठवड्याच्या सुरुवातीला भोलेबाबांचा सत्संग पार पडला. या ठिकाणी भोलेबाबांच्या सत्संगाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रचंड गर्दी झाली. या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली, त्यात १२१ लोकांचा जीव गेला. ज्यांचा मृत्यू झाला त्यात मोठ्या प्रमाणावर महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. भोले बाबा उर्फ नारायण साकार हरि यांच्या कार्यक्रमात ही दुर्घटना घडली.

या प्रकरणी करण्यात आलेल्या FIR मध्ये काय म्हटलं आहे?

भोलेबाबांच्या सत्संगाला दोन लाखांहून अधिक नागरिक मंडपात उपस्थित होते. भोलेबाबा दुपारी साडेबारा वाजता घटनास्थळी दाखल झाले. एक तास हा कार्यक्रम सुरू होता. दुपारी १.४० च्या सुमारास बाबा मंडपातून बाहेर येऊन इटावाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाकडे जात होते. त्याच वेळी भाविक त्यांच्या दिशेने पळाले तसेच बाबा जात असलेली जमिनीवरील माती कपाळाला लावण्यासाठी पळापळ करू लागले असे अहवालात नमूद केले आहे. अधिकाधिक नागरिक महाराजांच्या वाहनाच्या दिशेने पळू लागल्यावर परिस्थिती बिघडली. बाबांच्या सुरक्षा रक्षकांनी नागरिकांना मागे ढकलले. त्यामुळे काही नागरिक खाली पडले. मोकळ्या मैदानात जाण्यासाठी नागरिक धावपळ करू लागले. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. मैदान निसरडं असल्याने नागरिक घसरून पडले. जे नागरिक पडले ते पुन्हा उठू शकले नाहीत असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.