काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा प्रवास सध्या तेलंगणा राज्यातून सुरू आहे. या यात्रेदरम्यान खासदार राहुल गांधी बहुतांश वेळा सभा, बैठका, भाषणांमध्ये व्यस्त असल्याचं दिसून येतं. या व्यस्त कार्यक्रमातून ब्रेक घेत राहुल गांधींनी लहानग्यासह क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला आहे. टीम इंडियाची जर्सी परिधान करत हा चिमुरडा ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झाला होता. राहुल गांधींनी टाकलेल्या गोलंदाजीवर त्याने तुफान फटकेबाजी केली. यावेळी उपस्थितांनी या दोन्ही खेळाडूंना भरभरून दाद दिली.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये झळकली अभिनेत्री पूजा भट्ट; फोटो शेअर करत म्हणाली…
या क्रिकेट सामन्याचा व्हिडीओ राहुल गांधींनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. ‘भारतीय जर्सी परिधान केल्यानंतर तुम्ही अजिंक्य बनता,’ अशा आशयाचं कॅप्शन गांधींनी या व्हिडीओला दिलं आहे. ‘वेल प्लेड टीम इंडिया’ असं म्हणत त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन केलं आहे. टी २० विश्वचषकात अटीतटीच्या सामन्यात भारतानं नुकताच बांगलादेशवर पाच धावांनी विजय मिळवला आहे.
तेलंगणानंतर ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात
येत्या सात नोव्हेंबरला ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. या यात्रेचा २० नोव्हेंबरपर्यंत राज्यात मुक्काम असणार आहे. महाराष्ट्रातील ३८२ किमीच्या यात्रेची सुरवात नांदेडमधून होणार आहे. ही यात्रा नांदेड ते जळगाव असा १६ दिवसांचा प्रवास करणार आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीतून सुरू झालेल्या या यात्रेत गांधींसह कार्यकर्ते एकूण ३ हजार ५०० किमीचा पायी प्रवास करणार आहेत. भाजपाच्या वर्चस्वामुळे काँग्रेसला देशभरात उतरती कळा लागली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला पुन्हा नव्याने उभारी देण्यासाठी ही यात्रा महत्त्वाची मानली जात आहे.