भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात महिला मल्लांनी सातत्याने कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी यासाठी आंदोलनही पुकारलं होतं. बृजभूषण यांच्याविरोधात या सगळ्यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. जेव्हा बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांना कुस्ती महासंघाचं अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं तेव्हा साक्षी मलिकने कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला तर बजरंग पुनियाने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. तर विनेश फोगाटने अर्जुन अवॉर्ड आणि मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे वातावरण तापलेलं असतानाच राहुल गांधी यांनी हरियाणाचा पैलवान दीपक पुनिया याच्या गावाचा दौरा केला आणि कुस्तीचे डावपेचही अनुभवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी यांनी छारा या गावाचा दौरा केला आणि वीरेंद्र आखाड्याच्या पैलवानांशी चर्चा केली. यावेळी बजरंग पुनियाही उपस्थित होता. छारा गाव हे दीपक पुनियाचं गाव आहे. दीपक पुनिया आणि बजरंग पुनिया या दोघांनीही आपल्या कुस्तीची सुरुवात वीरेंद्र आखाड्यातूनच केली होती.

आपल्या भेटी दरम्यान राहुल गांधी यांनी कुस्तीच्या विविध डावपेचांची माहिती घेतली. तसंच त्यांना काय समस्या जाणवत आहेत हे देखील त्यांनी जाणून घेतलं. राहुल गांधी यांनी या ठिकाणी डावपेच शिकले तसंच ते पैलवानांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आले होते असं पैलवान बजरंग पुनियाने सांगितलं. कुस्ती महासंघाच्या विरोधातल्या आंदोलनातला बजरंग पुनिया हा एक प्रमुख चेहरा आहे.

राहुल गांधी सकाळी सहा वाजताच या ठिकाणी पोहचले होते. त्यांनी पैलवानांसह व्यायाम केला, तसंच त्यांचे डावपेच जाणून घेतले. कुस्तीत पॉईंट कसे मिळतात तेदेखील त्यांनी जाणून घेतलं. बजरंग पुनियाशी त्यांनी कुस्तीही खेळली असं बजरंगने सांगितलं. यानंतर राहुल गांधी रोहतक या ठिकाणीही गेल्याची माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mp rahul gandhi reaches virender arya akhara in chhara village interacts with wrestlers including bajrang poonia scj