काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरु झाली आहे. राहुल गांधी यांच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा हा एक भाग आहे. आज राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडत असताना राहुल गांधी हे काँग्रेस कार्यकर्त्यांसह आसाम मध्ये आहेत. आसाममध्ये त्यांना संत श्रीमंत शंकरदेव यांच्या मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं. त्यावेळी मला मंदिर प्रवेश का नाकारला जातो आहे असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला.
नेमकं काय घडलं?
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार राहुल गांधी हे आसाममधल्या बटाद्रावा या ठिकाणी असलेल्या शंकरदेव महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी आले होते. तिथे त्यांना पोलिसांनी अडवलं. त्यावर राहुल गांधी म्हणाले, “ब्रदर इश्यू क्या है? मला बॅरिकेट्स पाहता येतील का? मला फक्त एक सांगा माझी चूक काय? मला मंदिरात जाण्यापासून का रोखलं जातं आहे? आम्ही कुठलाही नियम मोडलेला नाही. आम्हाला मंदिरात जायचं आहे. पण जाऊ दिलं जात नाहीये. मला परवानगी देण्यात आली आहे. मला निमंत्रणही मिळालं आहे. मला मंदिरात जाऊन हात जोडायचे आहेत. तरीही का अडवलं जातं आहे?” असे प्रश्न राहुल गांधी यांनी सुरक्षा रक्षकांना विचारले आहेत. तसंच आज बहुदा एकच व्यक्ती मंदिरात जाऊ शकते आहे असं म्हणत राहुल गांधी यांनी नाव न घेता पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.
आम्ही मंदिरात जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. आम्हाला अडवलं जातं आहे. मात्र त्याचं योग्य कारण दिलं गेलेलं नाही. आम्हाला परवानगी असूनही मंदिरात जाऊ दिलं जात नाही. आम्हाला मंदिरात येण्याचं निमंत्रण मिळालं म्हणून आम्ही आलो आहोत असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तुम्हाला कुणाला बोलवायचं आहे त्यांना बोलवा असंही राहुल गांधी हे सुरक्षा रक्षकांना म्हणाले आहेत. आम्ही बळजबरीने मंदिरात शिरणार नाही. ती आमची वृत्ती नाही. सक्तीने काही करणं हे आम्ही करणार नाही. राहुल गांधी शंकरदेव यांचे भक्त आहेत. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायच्या आहेत पण त्यांना अडवलं जातं आहे. या सगळ्या प्रकारानंतर राहुल गांधी यांच्या बरोबर आलेल्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन सुरु केलं आहे.