नागपूरमध्ये काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्ताने जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांसह राहुल गांधीही उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड शब्दांत हल्लाबोल केला. तसेच, काँग्रेसनं आत्तापर्यंत काय केलं? या भाजपाच्या प्रश्नावरही राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिलं. यावेळी त्यांनी अग्निवीर योजनेचाही उल्लेख करताना देशातील तरुणांचं पोट सोशल मीडियावर भरणार नाही असं म्हणत बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोट ठेवलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“कित्येक वर्षं यांनी तिरंग्याला सॅल्यूट केला नाही”

“काही लोक म्हणतात काँग्रेस पक्षानं काय केलं? स्वातंत्र्याच्या आधी जर तुम्ही या देशात आले असता, तर तेव्हा इथे ५००-६०० राजे होते, इंग्रज होते. भारतीय जनतेला कुठलाच अधिकार नव्हता. गरीबाची जमीन जर राजाला चांगली वाटली, तर एका सेकंदात तो राजा ती जमीन घेऊ शकत होता. या सगळ्या अधिकारांचं रक्षण राज्यघटना करते. आंबेडकरांनी, गांधीजींनी, नेहरूंनी मेहनतीनं ती बनवली. ती काँग्रेस पक्षानं दिली आहे. आरएसएसचे लोक याच्या विरोधात होते. आज राष्ट्रध्वजाच्या समोर उभं राहून हे सलाम ठोकतात. पण कित्येक वर्षं यांनी तिरंग्याला सलाम नव्हता केला”, अशा शब्दांत राहुल गांधींनी भाजपाबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही लक्ष्य केलं.

“देशाच्या हजारो वर्षांच्या इतिहासात एक गोष्ट पहिल्यांदा घडली. पहिल्यांदाच एका भारतीय व्यक्तीला एक मत देण्यात आलं. तो दलित असो, आदिवासी असो, महिला असो, कुठल्याही भागातला असो. प्रत्येक भारतीयाला राज्यघटनेनं एक मत दिलं. हे काँग्रेस पक्षानं केलं. गांधीजी तुरुंगात गेले. नेहरू तुरुंगात गेले. आंबेडकरांनी कित्येक वर्षं संघर्ष केला. हे काँग्रेस पक्षानं, आंबेडकरांनी, सगळ्यांनी मिळून केलं आहे”, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले. “जर तुम्ही इथे स्वातंत्र्यापूर्वी आले असते, तर तेव्हा भारतातील जनतेला कोणतेच अधिकार नव्हते. महिलांना अधिकार नव्हते. दलितांना कुणी स्पर्श करत नव्हतं. ही आरएसएसची विचारसरणी आहे. हे आम्ही बदललं आहे. पुन्हा एकदा हे भारताला त्याच काळात घेऊन जात आहेत”, असंही त्यांनी नमूद केलं.

“सर्व संस्थांवर यांचा ताबा”

“राज्यघटनेतून, तुमच्या मतदानातून वेगवेगळ्या संस्था तयार होतात. या तुमच्या संस्था आहेत. सर्वोच्च न्यायालय असो, निवडणूक आयोग असो. सगळ्या संस्थांवर हे ताबा मिळवत आहेत. भारतातील सर्व विद्यापीठांमधले सर्व कुलगुरू आज एकाच संघटनेचे आहेत. त्यांना येत तर काहीच नाही. भारताचे कुलगुरू आज मेरिटवर निवडले जात नाहीत. जर तुम्ही एका संघटनेत असाल तर तुम्हाला कुलगुरू होता येईल. ज्या संस्थांच्या माध्यमातून तुम्ही देश चालवू शकता, त्या सर्व संस्थांवर हे ताबा मिळवून बसले आहेत”, असा आरोप यावेळी राहुल गांधींनी केला.

“भाजपाचे एक खासदार घाबरत घाबरत मला म्हणाले…”, राहुल गांधींचा मोठा दावा; सांगितला ‘तो’ प्रसंग!

“गेल्या १० वर्षांमध्ये नरेंद्र मोदींनी किती लोकांना रोजगार दिला? ४० वर्षांपासून सर्वात जास्त बेरोजगारी आजघडीला आहे. देशाच्या कोट्यवधी तरुणांची शक्ती वाया जात आहे. आजकाल देशातला तरुण नोकरी करत नाही. तो ७-८ तास मोबाईलवर इन्स्टाग्राम, फेसबुकवर आहे. हे भारताचं सत्य आहे. त्याची ताकद वाया जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांवर, तरुणांवर हल्ले आणि दुसरीकडे देशाच्या दोन-तीन श्रीमंतांना देशातली सर्व संपत्ती दिली जात आहे. हे सत्य आहे”, अशी टीका राहुल गांधींनी केली.

“आता त्या तरुणांना खोटे सैनिक म्हटलं जातंय”

“काही दिवस आधी माझ्याजवळ काही तरुण आले आणि म्हणाले राहुलजी, अग्निवीर योजनेच्या आधी आम्हाला लष्करात घेतलं होतं. दीड लाख तरुणांना लष्करानं आणि वायूदलानं स्वीकारलं होतं. मोदी सरकारने अग्निवीर योजना लागू केली आणि दीड लाख तरुणांना त्यांनी लष्करात येऊ दिलं नाही. हे तरुण माझ्यासमोर रडत होते. म्हणत होते सरकारनं आमचं आयुष्य बरबाद केलं आहे. आता आमची चेष्टा केली जात आहे. गावात आम्हाला आता खोटे सैनिक म्हटलं जातं. यानं देशाचा फायदा होणार नाहीये. सगळा फायदा, देशाची संपत्ती निवडक लोकांच्या हातात जात आहे”, असा आरोप राहुल गांधींनी केला.

“भारताला ९० लोक चालवतात. आयएएस अधिकारी अर्थसंकल्प ठरवतात. मी संसदेत विचारलं की यातले ओबीसी किती आहेत? दलित किती आहेत? आदिवासी किती आहेत? भाजपाचे लोक शांत झाले. देशात किमान ५० टक्के ओबीसी, १५ टक्के दलित आणि १२ टक्के आदिवासी लोकसंख्या आहे. पण ९० अधिकाऱ्यांपैकी फक्त ३ ओबीसी आहेत. हे कसलं ओबीसी सरकार चाललं आहे? त्यांना कोपऱ्यात बसवून देतात. देशातील सर्वात मोठ्या १००-२०० कंपन्यांमध्ये कोण ओबीसी आहे? कोण दलित आहे? कोण आदिवासी आहे? हे मला दाखवून द्या. राज्यांच्या अधिकारी वर्गातही दाखवून द्या. मी म्हटलं जातीआधारीत जनगणना व्हायला पाहिजे. देशात ओबीसी किती आहेत हे कळायला पाहिजे. तेव्हापासून नरेंद्र मोदींचं भाषण बदललं. आधी स्वत:ला ओबीसी म्हणायचे. आता म्हणतात भारतात फक्त एकच जात आहे ती म्हणजे गरीब. मग तुम्ही ओबीसी कसे झालात?” असा सवाल राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress mp rahul gandhi targets pm narendra modi on cast based census in india pmw