राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता अंतिम टप्प्यात आहे. सोमवारी ही यात्रा श्रीनगरमध्ये संपेल. याआधी आज (रविवारी) दुपारी राहुल गांधी यांनी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवला. लाल चौकात तिरंगा फडकवणारे राहुल गांधी हे आतापर्यंतचे पंडित जवाहरलाल नेहरुंनंतरचे दुसरे काँग्रेस नेते ठरले आहेत. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत सकाळी काही किलोमीटर चालल्यानंतर दुपारी १२ वाजता लाल चौकात पोहोचले. यावेळी राहुल यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा आणि इतर कांग्रेस नेते देखील उपस्थित होते.
लाल चौकात तिरंगा फडकवण्यापूर्वी काँग्रेस नेत्यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गायलं. त्यानंतर राहुल गांधी पुढच्या प्रवासाला निघाले. राहुल गांधी पुढे गेल्यानंतरही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी लाल चौकात सेलिब्रेशन केलं.
…तर काँग्रेस काहीही सहन करणार नाही : सुक्खू
यावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू देखील उपस्थित होते. सुक्खू म्हणाले की, समाजात जेव्हा तिरस्कार वाढत होता तेव्हा राहुल गांधी यांनी कन्याकुमारी पासून ते काश्मीरपर्यंतची ही यात्रा सुरू केली. तिरस्कार सोडून भारत जोडा असं या यात्रेचं ब्रीद आहे. कोणीही या देशाच्या स्वातंत्र्याला धक्का लावला तर काँग्रेस ते सहन करणार नाही.
हे ही वाचा >> भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभासाठी २१ पक्षांना आमंत्रण, तृणमूलसह हे ९ पक्ष येणार नाहीत, कारण काय?
३१ वर्षांपूर्वी मुरली मनोहर जोशी आणि मोदींनी फडकवला होता तिरंगा
तब्बल ३१ वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन वरीष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी २६ जानेवारी १९९२ रोजी लाल चौकात तिरंगा फडकवला होता. यावेळी जोशींसोबत नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाने तिरंगा फडकवण्याची घोषणा केल्यापासून काश्मीर घाटीमध्ये तणाव निर्माण झाला होता.