नवी दिल्ली : ‘बॉलिवूडच्या अभिनेत्री इथे येऊन स्वत:चे प्रमोशन करत आहेत, इथे केंद्रीय मंत्री त्यांना मिठाई भरवत आहेत, फोटोशेसन करत आहेत. पण, तुम्ही महिला आदिवासी राष्ट्रपतींना बोलावले नाही. महिलांच्या आरक्षणासाठी हे अधिवेशन घेत असताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू इथे आल्या असत्या तर अधिक चांगले झाले असते’, अशी चौफेर टीका काँग्रेसच्या राज्यसभेतील खासदार रजनी पाटील यांनी गुरुवारी केली.
विशेष अधिवेशनानिमित्त गेल्या तीन दिवसांपासून बॉलिवुडच्या अभिनेत्री नव्या संसद भवनाला भेट देत असून संसदेच्या आवारात या अभिनेत्री चर्चेचा विषय ठरल्या आहेत. महिला आरक्षण विधेयकावरील चर्चेत हाच मुद्दा उपस्थित करत रजनी पाटील यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री आणि भाजपच्या नेत्यांना जबर चपराक दिली.
हेही वाचा >>> भारताच्या ‘व्हिसाबंदी’नंतरही कॅनडाची ताठर भूमिका; खलिस्तानवादी नेत्याचे हत्याप्रकरण गांभीर्याने घ्यावे : ट्रुडो
जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना भेट द्या. मणिपूरला जा, तिथे महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यांचे सांत्वन तुम्ही करायला जात नाही. त्यांच्याबद्दल तुमच्या मनात ओलावा निर्माण होत नाही. ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकून देणाऱ्या महिला कुस्तीगीरांना तुम्ही रस्त्यावरून फरफटत नेले होते. त्यांच्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही. पण, तुम्हाची सहानुभूती बॉलिवुडच्या अभिनेत्रींना आहे, असे वाभाडे रजनी पाटील यांनी काढले.
महिलांना ‘वंदना’ करण्याच्या नावाखाली भाजप राजकीय लाभ मिळवू पाहात आहे. आम्हाला तुम्ही वंदन करू नका, आम्हाला तुम्ही देवी बनवू नका, आम्हाला बहीणही बनवू नका, आमचा व्यक्ती म्हणून सन्मान करा, असे रजनी पाटील म्हणाल्या.
हेही वाचा >>> आरक्षणाची वाटणी? अनुसूचित जाती प्रवर्गात बदलाच्या केंद्राच्या हालचाली
तुम्हीच महालक्ष्मी..
या वेळी सभापतीपदाच्या आसनावर जया बच्चन होत्या. रजनी पाटील यांनी मराठीमध्ये बोलण्याची विनंती करताच बच्चन यांनी त्यांना मराठीत, ‘झालं तुमचं बोलून’, असं म्हणत थांबण्यास सांगितले. आमच्याकडे गणपती आणि गौरीही आहेत, मला मराठीत बोलू द्या, असे रजनी पाटील म्हणताच, ‘तुम्हीच महालक्ष्मी आहात’, असे जया बच्चन म्हणाल्या.
जया बच्चन अचंबित!
रजनी पाटील बॉलिवूडच्या अभिनेत्रींच्या संदर्भात भाजपच्या मंत्र्यावर टीका करत असताना सभापतींच्या आसनावर ‘सप’च्या खासदार व अभिनेत्री जया बच्चन बसल्या होत्या. रजनी पाटील यांनी बॉलिवुडच्या अभिनेत्रींवर केलेल्या टीकेमुळे त्या अचंबित झाल्या, नंतर थोडय़ा नाराजही झाल्या. औचित्य साधून पाटील यांनी स्वत:ला आवरले. झाला प्रकार बघून अवघे सभागृहात हास्यात रमले! जया बच्चन यांनी रजनी पाटील यांना हात करून थांबवले व ‘मी सभापतींच्या आसनावर बसले असल्याने मला आत्ता काही बोलता येणार नाही’, असे म्हणत जया बच्चन यांनी विषय संपवला.