काँग्रेसमध्ये येत्या १७ ऑक्टोबरला अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसमधील अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तिरुअनंतपूरमचे खासदार शशी थरुर हे देखील अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावर आता शशी थरुर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“पुढील तीन आठवड्यांत सर्व काही स्पष्ट होईल. तेव्हाच मी यावरती स्पष्टीकरण देऊ शकेल. मी निवडणूक लढणार की नाही ते सांगणार नाही. मात्र, लोकशाही पध्दतीने कारभार चालत असलेल्या पक्षात निवडणूक नेहमीच चांगली असते,” असे शशी थरुर यांनी सांगितलं आहे.

“नवीन अध्यक्ष पक्षाला नवसंजीवनी देईल”

गांधी कुंटुबातील सदस्य निवडणूक लढवणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यावर बोलताना शशी थरुर म्हणाले, “त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने निवडणूक लढणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष असणे पक्षाच्या हिताचे आहे. नवीन अध्यक्ष पक्षाला नवसंजीवनी देईल. ज्याची काँग्रेसला नितांत गरज आहे.”

“ज्यांना निवडणूक लढायची आहे, ते लढू शकतात”

“काँग्रेस अध्यपदासाठीची निवडणूक जाहीर झालं आहे. त्यामुळे पक्षात कोणीही निवडणूक लढवू शकतो. १७ ऑक्टोबरला पक्षाला नवीन अध्यक्ष मिळेल. ज्यांना निवडणूक लढवायची आहे, ते लढवू शकतात. काँग्रेस हा लोकशाही पक्ष आहे,” असं काँग्रेसचे नेते जयराम रमेश म्हणाले. ते भारत जोडो यात्रेच्या प्रचारानिमित्ताने तिरुअनंतपूरममध्ये आले होते. तेव्हा ते बोलत होते.

राहुल गांधीच्या नावाला पहिली पसंती

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूक १७ ऑक्टोबरला होणार आहे. २२ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात येणार आहेत. या निवडणुकीचा निकाल १९ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी होणारी ही खुली निवडणूक आहे. कोणीही त्यात भाग घेऊ शकतो. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून अध्यक्षपदासाठी राहूल गांधींच्या नावाला पहिली पसंती देण्यात आली आहे. परंतु, राहुल गांधींना अध्यक्षपदाची जबाबदारी घेण्यात कोणताही रस असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader