करोना साथीच्या मंदीतून जग सावरत असताना भडकलेले इंधनदर आणि महागाईच्या चढत्या आलेखामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची किंमत प्रचंड घसरली आहे. सध्या १ डॉलरसाठी ८० रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेचं कोट्यवधींचं नुकसान होत आहे. याशिवाय सोमवारपासून केंद्र सरकारने वेष्टनातील अत्यावश्यक अन्नपदार्थ ते खासगी रुग्णालयांतील उपचार अशा अनेक महत्त्वाच्या बाबी महाग वस्तूंच्या यादीत समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण येत आहे.
पीठ, पनीर, दही यांसारखे वेष्टनांकित आणि लेबल (खूण पट्टी) लावलेले खाद्यपदार्थ आतापर्यंत ‘जीएसटी’मुक्त होते, परंतु सोमवारपासून त्यांवर पाच टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. त्याचबरोबर रुग्णालयातील पाच हजारांहून अधिक भाडे असलेल्या खोलीसाठीही पाच टक्के जीएसटी भार रुग्णांवर पडणार आहे. म्हणजे खासगी रुग्णालयांतील उपचारही महाग होणार आहेत. यामुळे विरोधी पक्षाकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.
दरम्यान, काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी भाजपा नेत्या किरण बेदी यांचं महागाईबाबतचं एक जुनं ट्वीट शेअर करत केंद्र सरकारला खोचक टोला लगावला आहे. किरण बेदी यांनी २०१२ मध्ये एक ट्वीट करत महागाईवरून काँग्रेस सरकारवर टीका केली होती. बेदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, “पेट्रोलच्या किमतीप्रमाणे तुमचा आनंद वाढत जावो, भारतीय रुपयांप्रमाणे तुमचं दु:ख कमी होवो, भारतातील भ्रष्टाचाराप्रमाणे तुमचं हृदय आनंदाने भरू दे.”
याचं ट्वीटचा स्क्रीनशॉट शेअर करत शशी थरूर यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सध्याच्या वाढत्या महागाईचं आपण यापेक्षा चांगलं वर्णन करू शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांची ही पोस्ट आता सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.