नवी दिल्ली : लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ‘सभागृहातील शिष्टाचार’ पाळण्याचा दिलेला सल्ला नेमका कोणत्या घटनेबाबत होता, असा सवाल विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीने गुरुवारी केला. याबाबत स्पष्टता नसल्याने भाजपकडून राजकारण केले जात असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. सभागृह चालविण्याच्या पद्धतीवरही यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली असून एकूण आठ मुद्द्यांकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
राहुल गांधी बुधवारी बोलण्यासाठी उभे राहिले असताना बिर्ला यांनी विरोधी पक्षनेत्यांसह अनेक नेते सभागृहाचे शिष्टाचार पाळत नाहीत. नियम ३४९चे पालन झालेच पाहिजे, अशी टिप्पणी करत कामकाज तहकूब केले. त्यानंतर भाजपच्या माहिती तंत्रज्ञान शाखेचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसृत करत बिर्ला यांनी दिलेली समज याबाबत असावी, अशी शक्यता व्यक्त केली. हाच आधार घेत ‘इंडिया’ आघाडीने गुरुवारी बिर्ला यांची भेट घेऊन भाजपकडून त्यांच्या टिप्पणीचा वापर राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोप केला.
काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया’च्या शिष्टमंडळाने बिर्ला यांना एक सविस्तर पत्र देण्यात आले. यामध्ये बिर्ला यांनी नेमक्या कोणत्या घटनेच्या संदर्भात ही टिप्पणी केली, हे स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सभागृहाच्या परंपरा पाळल्या जात नसल्याकडेही बिर्ला यांचे लक्ष वेधण्यात आले.
पत्रास कारण की…
ओम बिर्ला यांना पाठविण्यात आलेल्या पत्रावर ‘इंडिया’ आघाडीतील बहुतांश पक्षांच्या स्वाक्षऱ्या आहेत. राहुल गांधींवरील टिप्पणीच्या निमित्ताने हे पत्र लिहिण्यात आले असले तरी सभागृह चालविण्याच्या पद्धतीबाबत यात आठ गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत.
●लोकसभा उपाध्यक्षांची अद्याप निवड नाही
●विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिले जात नाही
●कामकाज सल्लागार समितीच्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले जाते
●स्थगन प्रस्तावांकडे दुर्लक्ष होते किंवा फेटाळले जातात
●खासगी विधेयकांकडे दुर्लक्ष केले जाते
●अर्थसंकल्प आणि अनुदान मागण्यांमधून महत्त्वाची मंत्रालये वगळली जातात
●नियम १९३ अंतर्गत चर्चेला (मतदानाशिवाय लोकहिताच्या मुद्द्यांवरील चर्चा) बगल दिली जाते●विरोधी पक्षाच्या सदस्यांचे माईक बंद असतात