आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव अटळ आहे, असा दावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी मंगळवारी येथे केला. मुझफ्फरनगर दंगलग्रस्तांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी करात यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची निवासस्थानी भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते.
करात म्हणाले, आमच्या पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काँग्रेससाठी सध्याची स्थिती अतिशय प्रतिकूल असून आगामी निवडणुकीत त्यांचा पराभव अटळ आहे. प्रत्येक राज्यात स्थानिक पक्ष मोठी भूमिका बजावतील. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना सत्तेपासून दूर ठेवावे, असे असंख्य लोकांना वाटत असून त्यांची मते निश्चितपणे आम्हालाच मिळतील. दिल्लीत काँग्रेसला पर्याय म्हणून लोकांनी आम आदमी पक्षाला कौल दिला, मात्र हा पक्ष सगळीकडे नसल्याने जेथे-जेथे काँग्रेसविरोधी वातावरण असेल तेथे आमच्याच पक्षाला लाभ होईल.
अखिलेश यांच्याशी झालेल्या भेटीत तिसऱ्या आघाडीचा विषय निघाला का, असे विचारले असता करात म्हणाले, या भेटीत आम्ही केवळ दंगलग्रस्तांची स्थिती व पुनर्वसन याबाबत चर्चा केली. अद्यापही हजारो दंगलग्रस्त मदत छावण्यांमध्ये राहात असून त्यांना आणखी साहाय्य करण्याची आवश्यकता आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला तिसऱ्या आघाडीत सहभागी करून घेण्याची शक्यता करात यांनी फेटाळली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा