काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीत आहेत. नाना पटोले दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेणार आहेत. राज्यात झालेलं सत्तांतर तसंच मतफुटीच्या मुद्द्यावर नाना पटोले पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. एबीपी माझाशी बोलताना नाना पटोले यांनी आपण हायकमांडकडे वेळ मागितली असून वेळ मिळाल्यास सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल असं सांगितलं आहे. तसंच हायकमांडने मतफुटीचा मुद्दा गांभीर्याने घेतला असल्याचंही ते म्हणाले आहेत.
विधान परिषदेतील मतफुटीवर बोलताना ते म्हणाले की, “किती मतं फुटली याचा अंदाज पक्षाला आला असून त्याची दखल घेण्यात आली आहे. पण सध्या मी यासाठी आलेलो नाही. मला संसदेत काही महत्वाची कामं आहेत. मी हायकमांडची वेळ मागितली आहे. वेळ मिळाल्यास नक्कीच सर्व मुद्द्यांवर हायकमांडसोबत चर्चा करु”.
चंद्रकांत हंडोरे यांच्या परभवाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “हायकमांडने मतफुटीचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. हंडोरे यांच्यासारखं दलित नेतृत्व जे महाराष्ट्रातील सर्वांना मान्य आहे, त्यांना ठरवून पाडण्याची प्रक्रिया ज्यांनी केली असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. काय कारवाई करायची याचा निर्णय हायमांडच घेईल, त्याकडे आमचंही लक्ष आहे”.
विश्वासदर्शक ठरावावेळी काँग्रेसचे अनेक नेते अनुपस्थित असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ही गंभीर बाब तर आहे, पण त्यामागे त्यांचा हेतू काय होता यासंबंधी हायकमांडसंबंधी विचारणा होईल. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे वरिष्ठ नेत्यांना पाठवून माहिती घेतली जाणार आहे”.