Waqf Amendment Act Supreme Court Stay : वक्फ सुधारणा कायद्यातील दोन कलमांच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं काँग्रेसने स्वागत केलं आहे. ‘सत्यमेव जयते’ अशी पहिली प्रतिक्रिया काँग्रेसकडून आली आहे. काँग्रेसचे नेते व माजी आमदार नसीम खान यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने नुसती स्थगिती दिलेली नाही तर केंद्र सरकारकडे जबाब मागितला आहे. या कायद्यातील अनेक मुद्द्यांवर आक्षेप घेतला आहे.”
नसीम खान म्हणाले, “आम्ही सुरुवातीपासूनच सांगतोय की हा नियमबाह्य कायदा आहे. देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत वक्फ सुधारणा विधेयकाच्या नावाखाली, मुस्लीम समाजाच्या उत्थानाच्या नावाखाली, गरीब मुसलमानांना मदत करण्याच्या नावाखाली हा जो नियमबाह्य कायदा बनवला आहे, त्याचा आम्ही विरोध केला होता. संपूर्ण देश पातळीवर, लोकसभा-राज्यसभेपासून ते रस्त्यांवर उतरून आम्ही विरोध केला. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने त्यातील काही कलमांवर स्थगिती दिली आहे.
नसीम खान नेमकं काय म्हणाले?
काँग्रेस नेते म्हणाले, “या निर्णयासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत करतो. दूध का दूध आणि पाणी का पाणी दाखवण्यास सर्वोच्च न्यायालयाने सुरुवात केली आहे. आम्हाला विश्वास आहे की येत्या काळात यावर पुढील सुनावणीवेळी न्यायालय जनतेच्या बाजूने निकाल देईल. सरकारने जबरदस्तीने नियमबाह्य कायदा मंजूर करून घेतला आहे. त्यांनी या कायद्यात ज्या नियमबाह्य तरतुदी केल्या आहेत त्या सर्वोच्च न्यायालय निश्चितपणे निरस्त करेल.”
काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान म्हणाले, “आज वक्फ बिलाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. या निकालानंतर स्पष्ट झालंय की सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळतो. या न्यायासाठीच, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि सर्व खासदारांनी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी या कायद्याचा लोकसभेपासून, राज्यसभेपासून ते देशातील रस्त्यांवर सगळीकडे विरोध केला होता. हा बेकायदेशीर कायदा असल्याचं ठणकावून सांगितलं. न्यायालयाने केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. त्यावरून सरकारची धोरणं समजतायत. विरोधी पक्षांच्या मागणीनुसार आता न्यायालयाने त्या कायद्यावर स्थगिती दिली आहे.