नवी दिल्ली: फक्त आमच्याच पक्षात लोकशाही असल्याचा दावा काँग्रेसचे नेते करत असले तरी, पक्षाच्या निर्णयप्रक्रियेतील सर्वोच्च समिती असलेल्या कार्यकारिणी समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक न घेण्याचा निर्णय शुक्रवारी रायपूरमध्ये राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सुकाणू समितीच्या बैठकीत घेण्यात आला. निवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्षांना देण्यात आले. या निर्णयामुळे गांधी निष्ठावानांचे पक्षावरील वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले.
काँग्रेसच्या तीन दिवसांच्या राष्ट्रीय अधिवेशनाला रायपूरमध्ये शुक्रवारी सुरुवात झाली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुकाणू समितीतील उपस्थित ४५ सदस्यांनी एकमताने कार्यकारिणी समितीची निवडणूक न घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती पक्षाचे माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सुकाणू समितीचे सदस्य असूनही सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वाड्रा हे तिघेही बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. कोणत्याही दबावाविना सुकाणू समितीमध्ये चर्चा केली जावी व निर्णय घेतला जावा, यासाठी गांधी कुटुंबियातील एकही सदस्य बैठकीला न आल्याचे सांगितले जात होते. पण, कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीपासून पक्षाला परावृत्त करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याने हे तिघे बैठकीमध्ये सहभागी झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसच्या पक्षघटनेमध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. घटनेतील १६ अनुच्छेद आणि त्यातील ३२ नियमांमधील बदलांना मंजुरी दिली जाणार आहे. या बदलांच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरांतील पक्ष कार्यकर्त्यांना कार्यकारिणी समितीमध्ये स्थान देण्यात येणार आहे. समिती सदस्यांची निवड निवडणुकीद्वारे केली तर या समाजघटकांना कसे सामावून घेणार, असा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. विधानसभा-लोकसभेच्या निवडणुकीत राखीव जागा ठेवून विविध समाजघटकांना प्रतिनिधित्व दिले जाते, हीच पद्धत काँग्रेसलाही अवलंबावी लागली असती. त्यामुळे पक्षाने कार्यकारिणी समितीच्या सदस्य निवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्षांकडे देण्याचा निर्णय घेतला.
‘आमच्या पक्षामध्ये सगळय़ांना बोलू दिले जाते. त्यामुळे सुकाणू समितीच्या ४५ सदस्यांनी आपापली मते मांडली. निवडणुकीचे काय परिणाम होतील यावरही अनेक सदस्यांनी मते मांडली. कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीबाबत मतमतांतरे होती पण, अखेर सर्वानुमते निर्णय घेतला गेला. सदस्यांनी सहमती दर्शवताना दोन हात वर केले, यावरून निर्णयप्रक्रियेमागील तीव्र भावना समजू शकेल’, असे जयराम रमेश म्हणाले.
पक्षाच्या घटनेमध्ये होणाऱ्या बदलांमुळे माजी पक्षाध्यक्ष व काँग्रेसचे माजी पंतप्रधान यांनाही कार्यकारिणीचे सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. त्यामुळे सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच, मनमोहन सिंग हेही कार्यकारिणीचे सदस्य असतील. निवडणूक होणार नसल्यामुळे सर्व २५ सदस्यांची नियुक्ती पक्षाध्यक्ष खरगे करतील. काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद गांधीतर नेत्याकडे देण्यात आले असले तरी, कार्यकारिणी समितीवर मात्र गांधी कुटुंबातील तीनही सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे अंतर्गत लोकशाहीच्या दाव्याला गालबोट लागू शकते.
घटनेतील दुरुस्त्यांना मंजुरी दिली जाणार आहे. राजकीय, आर्थिक, परराष्ट्र संबंध, सामाजिक न्याय, शेती आणि युवा, शिक्षण, रोजगार या सहा विषयांवरील ठरावही निश्चित केले जातील व त्यावर शनिवारी खुली चर्चा केली जाईल. शनिवारी सकाळी साडेदहा वाजता पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे भाषण होईल. त्यानंतर माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करतील. रविवारी सकाळी साडेदहा वाजता राहुल गांधींचे भाषण होणार असल्याची माहिती जयराम रमेश यांनी दिली.