गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला अतिशय दुय्यम वागणूक दिली. त्यामुळे २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत काँग्रेसबरोबर युती ठेवायची की नाही, याचा गंभीर फेरविचार आम्हाला करावा लागेल, असे रोखठोक प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी येथे केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पवार म्हणाले, गुजरातमध्ये काँग्रेसशी आमची युती झाली होती. काँग्रेसने आम्हाला नऊ जागा दिल्या. मात्र त्यातील पाच जागांवर काँग्रेसचेही उमेदवार उभे राहिले आणि उरलेल्या जागांवर काँग्रेस बंडखोर उभे राहिले. याला आघाडीचा धर्म आणि साहचर्य म्हणत नाहीत. युती करायची तर पारदर्शकपणा आणि प्रामाणिकपणा अनिवार्य आहे. त्यांची वृत्ती अशीच राहिली तर पुढील लोकसभा, विधानसभा निवडणुकांत आघाडी करायची की नाही याचा गंभीरपणे विचार करावाच लागेल.
महिलांवरील अत्याचारांविरोधातील कायदे कठोर करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना आपल्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader