शिवमोगा : काँग्रेसला कर्नाटकात जवळपास ६० जागांवर योग्य उमेदवार मिळत नसल्याचा दावा भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला. पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत पराभव होईल, त्यांना गेल्या वेळेपेक्षा कमी जागा मिळतील असे ते म्हणाले.
काँग्रेसकडे केवळ उमेदवारांची वानवा नाही तर त्यांना राज्यात काहीही स्थान नाही आणि त्यांच्याकडे राज्याच्या राजकारणाबद्दल कोणतीही स्पष्टता नाही अशी टीका बोम्मई यांनी केली.
काँग्रेसकडे स्वत:चे उमेदवार नसल्यामुळे ते इतर पक्षांमधून उमेदवार आयात करत आहेत असे बोम्मई म्हणाले. उमेदवारांची दुसरी यादी तयार करताना काँग्रेसचे डी के शिवकुमार आमच्या आमदारांना फोन करून निवडणूक लढवण्यासाठी विचारणा करत होते असा आरोप त्यांनी केला.
कर्नाटकबाबत भाजपची रविवारी दिल्लीत बैठक
नवी दिल्ली: भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची येथे ९ एप्रिल रोजी बैठक होणार आहे. यामध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित केले जातील. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा, गृहमंत्री अमित शहा तसेच इतर नेते उपस्थित राहणार आहेत. कर्नाटकमधील भाजप नेत्यांनी उमेदवारी यादीला अंतिम स्वरूप दिले आहे. ही यादी केंद्रीय समितीपुढे ठेवली जाईल. भाजपचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंह तसेच निवडणूक प्रभारी धर्मेद्र प्रधान व राज्यातील अन्य नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारांची नावे ४ एप्रिलला निश्चित करण्यात आली.
कोलार येथे सोमवारी राहुल यांची सभा
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची कोलार येथे १० एप्रिलला सभा होणार आहे. त्यानंतर ११ एप्रिलला वायनाड मतदारसंघात त्यांचा दौरा अपेक्षित आहे. केरळमधील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी हे विजयी झाले होते. मात्र सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा दिल्यानंतर राहुल यांचे संसद सदस्यत्व गेले. कर्नाटकमध्ये एप्रिल २०१९ मध्ये कोलार येथील प्रचारसभेतील भाषणाने राहुल यांची खासदारकी गेली. आता कोलारमध्ये पुन्हा सभा घेण्याचे काँग्रेसचे नियोजन आहे.