दिल्लीत १९८४ साली उसळलेल्या शीख विरोधी दंगलीत काँग्रेस पक्ष सहभागी नव्हता असा दावा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. शुक्रवारी ब्रिटनच्या संसदेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना सीएनएन न्यूज १८ वाहिनीच्या प्रतिनिधीने १९८४ सालच्या शीख विरोधी दंगलीसंबंधी प्रश्न विचारला. त्यावर राहुल म्हणाले कि, १९८४ सालच्या त्या हिंसाचाराबद्दल माझ्या मनात कुठलाही गोंधळ नाहीय. ती एक दु:खद घटना होती. वेदनादायी अनुभव होता. तुम्ही म्हणाल कि, काँग्रेस पक्ष त्यामध्ये सहभागी होता. पण मी तुमच्या मताशी सहमत नाही असे राहुल म्हणाले.
राजधानी दिल्लीत उसळलेल्या त्या दंगलीत तीन हजार शिखांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात पुन्हा राहुल यांना १९८४ सालच्या शीख विरोधी दंगल आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विधानासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
त्यावर राहुल म्हणाले कि, मनमोहन सिंग आमच्या सर्वांच्या वतीने बोलले. मी स्वत:हा हिंसाचाराने पीडित आहे. त्यामुळे त्या वेदना काय असतात हे मला चांगले ठाऊक आहे. पृथ्वीवर कोणाच्याही विरोधात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार करण्याला माझा विरोध आहे. जेव्हा कोणाला वेदना होतात तेव्हा ते पाहून मला दु:ख होते. त्यामुळे मी शीख विरोधी दंगलीचा निषेध करतो. जे कोणी अशा प्रकारच्या हिंसाचारात सहभागी आहेत त्यांना शासन झालेच पाहिजे असे राहुल म्हणाले.
आरएसएसचं दहशतवादी मुस्लीम ब्रदरहूडशी साम्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारताचा आत्माच बदलायचा असून अन्य कुठल्याही संघटनांनी भारतातल्या संस्थांवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केला आहे. लंडनमध्ये इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्ट्रेटेजिक स्टडीज येथे शुक्रवारी ते बोलत होते. गांधी हे सध्या जर्मनी व इंग्लंडच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. मुस्लीम ब्रदरहूड या अनेक अरब देशांनी दहशतवादी म्हणून जाहीर केलेल्या संघटनेशी गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना केली. मुस्लीम ब्रदरहूडच्या संकल्पनेशी आरएसएसची संकल्पना मिळतीजुळती असल्याचा आरोप यावेळी गांधी यांनी केला आहे.