आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत जोरदार चर्चा चालू आहेत. इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी ही लढत रंगणार असल्याने कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. आप आणि काँग्रेस हे दोन्ही शत्रू पक्ष इंडिया आघाडीच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपांवरून प्रचंड मतभेद होते. परंतु, हे मतभेद आता दूर झाले असल्याची शक्यता आहे. कारण, एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली, गुजरात, गोवा आणि हरियाणामधील जागांसाठी आप आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपाची गणितं ठरली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिल्यानुसार, आप नवी दिल्ली व्यतिरिक्त पूर्व, पश्चिम आणि दक्षिण दिल्लीतून उमेदवार उभे करणार आहेत. तर काँग्रेस उत्तर-पश्चिम, ईशान्य दिल्ली आणि चंडी चौकमधून निवडणूक लढवेल. दरम्यान, याबाबतची अधिकृत घोषणा इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत करण्यात येणार आहे.

तसंच, गोवा, चंदीगड, गुजरात आणि हरियाणासाठी देखील या दोन्ही पक्षांत जागा वाटप झाल्याचं वृत्त आहे. भाजपाने गेल्या निवडणुकीत गुजरात आणि हरियाणामध्ये बाजी मारली होती. लोकसभेच्या फक्त दोन जागा असलेल्या गोव्यात भाजपाने उत्तर गोवा जिंकला आणि दक्षिण गोव्यात काँग्रेसच्या फ्रान्सिस्को सार्डिन्हा १० हजाराच्या फरकाने जिंकले होते. मागच्या निवडणुकीत भाजपाने चंदीगडही काबिज केले होते. या मतदारसंघातून १९९९, २००४ आणि २००९ या तिन्ही वेळा काँग्रेसकडून पवन कुमार बन्सल विजयी झाले होते. त्यामुळे या जागेवर काँग्रेसला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. परंतु, येथून आप पक्षही आग्रही असल्याचं वृत्त आहे.

उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यात तिढा कायम

जागा वाटपासाठी इंडिया आघाडीत चर्चा सुरू आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासह अनेक राज्यात जागा वाटपाचा निर्णय होणं बाकी आहे. येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. त्याआधीच हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये एकला चलो रे

इतर राज्यात काँग्रेस आणि आपने एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असला तरीही पंजाबमध्ये आप आणि काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये आपचे १३ उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress on seat share speed run deal done with aap for delhi gujarat sgk
Show comments