पदाधिकारी तसेच समविचारी संघटनांच्या बैठकांच्या फेऱ्या

हिंदी पट्टय़ातील तीनही राज्यांतील सत्ता गमावल्यानंतर दोन दिवसांनी, गुरुवारी, भाजपमध्ये पराभवाची कारणमीमांसा आणि आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘मंथन’ सुरू झाले आहे. पक्षात आता समविचारी संघटनांच्या बैठकांच्या फेऱ्याही सुरू होत असून गेल्या चार वर्षांत एकदाही न झालेली राष्ट्रीय परिषदेची बैठक आता ११ आणि १२ जानेवारी रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या बैठकीत देशभरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना म्हणणे मांडण्याची संधी मिळू शकेल. भाजपच्या मुख्यालयात पदाधिकारी-प्रदेशाध्यक्षांची मॅरेथॉन बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीनही राज्यांमध्ये काँग्रेसने बाजी मारल्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजूनही मौन सोडलेले नाही. दोघांपैकी कोणाही जाहीरपणे पराभवाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आता मोठय़ा निर्णयांची घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तीन राज्यांतील जिल्हानिहाय अहवाल अमित शहा यांनी मागवला होता. या अहवालांचे सविस्तर विश्लेषण केल्यानंतरच लोकसभा निवडणुकीसाठी आखणी केली जाणार असल्याचे सांगितले जाते.

मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी पराभवाची जबाबदारी घेऊन पदाचा राजीनामा दिला, मात्र अमित शहा यांनी तो फेटाळून लावला. राजस्थान आणि छत्तीसगढ या दोन राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रत्येक राज्याचे प्रभारी, संघटनमंत्री, पन्ना प्रमुख यांच्याशी चर्चेचे सत्र सुरू राहणार असून राष्ट्रव्यापी बूथ योजना अधिक व्यापक करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे.

खासदारांची बैठकीला दांडी

भाजपच्या संसदीय पक्षाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीला अनेक खासदार अनुपस्थित होते. पक्षाध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ‘मार्गदर्शक’ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद आदी बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीला अनेक खासदारांनी दांडी मारल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत होते. या बैठकीतही विधानसभा निवडणुकीवर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे समजते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि माजी संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांना आदरांजली वाहिली गेली.

 

Story img Loader