मेक इन इंडिया हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी विरोधकांविरोधात वातावरणनिर्मिती करण्याचे एक साधन असल्याची टीका बुधवारी काँग्रेसने केली. मोदी हे आर्थिक आघाडीवर अपयशी ठरल्याने ते काँग्रेसविरोधात निराधार आरोप करीत असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणापासून ते ऑगस्टा वेस्टलॅण्ड आणि इशरतजहाँ बनावट चकमक प्रकरणापर्यंत निराधार आरोप करण्याची क्षमता भाजपने सिद्ध केली आहे, मात्र आपल्या आरोपांच्या पुष्टय़र्थ पुरावे सादर करण्याच्या बाबतीत भाजप अकार्यक्षम ठरली आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. आपल्या संकेतस्थळावरून टीका करताना काँग्रेस समितीने म्हटले आहे की, काही चुकीचे घडल्याचे पुरावे असतील तर मोदी सरकार इतके अकार्यक्षम आहे की ते त्याविरुद्ध कारवाई करू शकत नाहीत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांनी लंडनमध्ये बेनामी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप भाजपने केल्यानंतर दोन्ही पक्ष एकमेकांवर हल्ले चढवीत आहेत.

Story img Loader