१९८४ मधील शीखदंगली प्रकरणी दिल्लीतील उच्च न्यायालयाने काँग्रेस नेता सज्जन कुमारला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी स्वागत केले आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर घडलेली ही अत्यंत हिंसक जातीयवादी घटना होती. सज्जन कुमार यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेमुळे पीडितांना अखेर न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच या घटनेत ना काँग्रेसचा हात होता ना गांधी कुटुंबीयांचा काही संबंध होता. भाजपा याचे नाहक राजकारण करत असल्याचा आरोपही अमरिंदर सिंग यांनी केला.
Punjab CMO: CM, however, reiterated his stand that neither the Congress party nor the Gandhi family had any role to play in the rioting & lashed out at the Badals for continuing to drag their names into the case at the behest of their political masters – BJP. https://t.co/dikm3vDGIX
— ANI (@ANI) December 17, 2018
१९८४ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत सहा व्यक्तींची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी सज्जन कुमार, ब्रह्मानंद गुप्ता, खुशाल सिंग, वेद प्रकाश आणि आणखी एकाविरोधात हत्येचा आणि दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उच्च न्यायालयाने सज्जन कुमारला दोषी ठरवले असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या निकालाचे अमरिंदर सिंग यांनी स्वागत केले. ही अत्यंत वाईट घटना होती. निकालामुळे पीडितांना न्याय मिळाला आहे. निर्णयाचे स्वागत करताना मात्र त्यांनी या दंगलीमागे काँग्रेस किंवा गांधी कुटुंबीयाची कोणतीच भूमिका नव्हती हे स्पष्ट केले. बादल यांनी भाजपाच्या सांगण्यावरुन याचे राजकारण करु नये, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सज्जन कुमारला ३१ डिसेंबरपर्यंत पोलिसांपुढे शरण येण्याची मुदत देण्यात आली आहे. सज्जन कुमारने दिल्ली महानगरपालिकेपासून राजकारणाला सुरुवात केली होती. तो तीन वेळा काँग्रेसचा खासदार होता. सज्जन कुमारसह कॅप्टन भागमल, गिरीधारी लाल आणि काँग्रेसचा माजी नगरसेवक बलवान खोखार या तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर किशन खोखार आणि महेंद्र यादव या दोघांना १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.