समाजमाध्यमांवर काँग्रेस पक्ष जेव्हा कात टाकतो..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मौसम का हाल.. चुनाव से पहले गुजरात में आज होगी जुमलों की बारिश.. ट्विटरवर असे बोचकारे नक्कीच नवे नसतील; पण ते जर @officeOfRG या हँडलवरून म्हणजे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या हँडलवरून असतील तर नक्कीच त्याची व्याप्ती आणि तीव्रता वाढते. अतिशय कमी शब्दांत लिहिलेल्या या ट्विटरचा अर्थातच रोख होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर.

सोमवारी गुजरातमधील दौऱ्यामध्ये मोदी ‘लोकप्रिय घोषणां’चा सपाटा लावण्याचा अंदाज काँग्रेस व विरोधकांना होता. किंबहुना मोदींना या घोषणा करता याव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने गुजरात निवडणुकीची घोषणा पुढे ढकलल्याचा आरोप होत आहे. तोच संदर्भ घेत राहुल म्हणताहेत, ‘‘आज होगी जुमलों की बारिश.’’ बरं ‘जुमला’ हा शब्द पुन्हा अमित शहांचाच! पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात भरण्याच्या आश्वासनाला ‘निवडणुकीचा जुमला’ असे त्यांनी मध्यंतरी म्हटले होते.

किती टोकदार हा बोचकार. पण राहुल यांच्या भात्यातून खचितच पहिला नाही. गेल्या चार-पाच महिन्यांमध्ये त्यांनी असे अनेक हल्ले चढविलेत. कमी शब्दांत भाजपला, मोदींना आणि शहांना जास्तीत जास्त घायाळ करण्याचा त्यांचा मुख्य हेतू. त्यासाठी प्रामुख्याने राजकीय उपहासाचा आधार हे त्याचे वैशिष्टय़. असे अनेक वैशिष्टय़पूर्ण हल्ले केलेत राहुल यांनी गेल्या काही महिन्यांत. मोदी सरकारकडून, भाजपशासित राज्यांकडून जशा एकापाठोपाठ एक चुका होत आहेत, तसतसे म्हणजे ऑगस्टपासून राहुल यांच्या हल्ल्यांना चांगलीच धार चढल्याचे दिसतंय. गुजरात निवडणुकीतही त्यांना त्याचा फायदा होत असल्याचे प्राथमिक निरीक्षण आहे.

२०१४च्या मोदींच्या झंझावातात पालापाचोळा होईपर्यंत काँग्रेसला उगवत्या समाजमाध्यमांचे भानच नव्हते. अगदी मोदी राजवटीतील पहिली दीड-दोन वष्रेही काँग्रेसला त्याची जाणीव तीव्रतेने होत नव्हती. स्वत राहुल हेच ट्विटरवर सुमारे दीड वर्षांपूर्वी आले. पण आता जो काही बदल (भाषेचा, नेमक्या संदर्भाचा, लक्ष्य अचूकपणे वेधण्याचा) दिसतोय त्याचे श्रेय रम्या ऊर्फ दिव्य स्पंदनाचे.

रम्या ही कन्नड अभिनेत्री. काँग्रेसची म्हैसूरची माजी खासदार. हरियाणातील तरुण तुर्क खासदार दीपेंदर हुडाकडून तिने मे महिन्यात समाजमाध्यम विभागाची सूत्रे हाती घेतली आणि बघता बघता राहुल यांच्या ट्विटर हँडलने जणू काही कातच टाकली. त्याचे फळही मिळताना दिसत आहे. काँग्रेसच्या ट्विटर हँडलची अनुनयांची (फॉलोअर्स) संख्या वीस लाखांहून २७ लाखांवर पोहोचली, तर राहुल यांच्या अनुनयांची संख्या २५ लाखांहून थेट ३७ लाखांवर पोचली. समाजमाध्यमांपासून आतापर्यंत फटकून राहणाऱ्या काँग्रेस व राहुल यांच्यासाठी ही संख्यावाढ घसघशीतच म्हणावी लागेल. पण काँग्रेसला केवढा पल्ला गाठायचा आहे, याचा अंदाज घ्यायचा असेल तर मोदींच्या ट्विटर अनुनयांची संख्या पाहावी लागेल. तब्बल ३ कोटी ५४ लाख मोदींचे ट्विटर अनुनयी आहेत, म्हणजे राहुल यांच्यापेक्षा दसपटीने जास्त. अगदी अमित शहांचीही संख्या राहुल यांच्या दुप्पट आहे. भाजपच्या ट्विटर अनुनयांची संख्या काँग्रेसच्या अधिकृत हँडलच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. एवढेच काय तर काँग्रेसचे केरळ खासदार शशी थरूर यांच्याही अनुनयांची संख्या राहुल यांच्यापेक्षा सुमारे वीस लाखांनी जास्त आहे.

राहुल यांच्यातील हे लक्षणीय बदल प्रामुख्याने दोन गोष्टींमुळे. एक, रम्याकडील कल्पकता आणि दुसरी म्हणजे तिने काँग्रेसच्या समाजमाध्यम विभागाचा बदललेला चेहरामोहरा. पन्नास एक कल्पक तरुणांची फळीच नव्याने कामाला लागलीय. त्यात ७५ टक्के महिला आहेत. या ‘वॉर रूम’मध्ये दोन गोष्टींना सर्वाधिक प्राधान्य. एक खोटय़ा बातम्यांना (‘फेक न्यूज’) आणि सरकारच्या कथित अवास्तव दाव्यांना उघडे पाडायचे. दुसरे म्हणजे, काँग्रेस समर्थकांना ‘भक्तां’बरोबरील वादविवादासाठी नवनवे मुद्दे पुरवायचे. त्यासाठी व्हिडीओ क्लिप्स तयार करणे, ग्राफिक्सचा आधार घेऊन सरकारला प्रश्न विचारणे, सरकारविरोधात आलेले चांगले लेख विविध भाषांमध्ये भाषांतरित करून सर्व माध्यमांवर फिरवणे.. अशी त्या ‘वॉर रूम’ची कामे. ट्विटर, फेसबुकपेक्षा सर्वाधिक महत्त्व दिले जाते ते व्हॉट्स अ‍ॅपला. त्याचे कारण सोपे. वापरायला सर्वाधिक सोपे, पोहोचवायला सर्वाधिक सोपे असे हे माध्यम. त्यासाठी आशयाची निरंतर निर्मिती करणे हे या रम्याच्या टीमचे मुख्य काम. या टीमने या क्षणाला तरी समाजमाध्यमांवर हुकूमत असलेल्या भाजपला विचारात पाडल्यासारखे दिसते आहे.

(गेल्या काही दिवसांमधील त्यांच्या ट्विटची झलक)

  • मोदींच्या आश्वासनांवर : २०१८ में मोदीजी गुजरात के हर व्यक्ती को चाँद पर एक घर देंगे और २०३० में मोदीजी चाँद को धरती पर ले आएंगे
  • शहांच्या मुलावरील आरोपाबाबत : जबरदस्त बदल.. बेटी बचाओ ते ‘बेटा बचाव’ जय शाह-‘जादा’ खा गया..
  • पाक- अमेरिकी संबंधांबाबत : मोदी जी, पळा लवकर.. अध्यक्ष ट्रम्प यांची अजून एकदा गळाभेट घ्यायचीय
  • भूक निर्देशांकातील घसरणीवर : भूख है तो सब्र कर, रोटी नहीं तो क्या हुआ आजकल दिल्ली में है जेर-ए-बहस ये मुद्दआ

दुश्यंत कुमार

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress party on social media rahul gandhi modi