अधिवेशनात पंतप्रधानांविरोधात काँग्रेसची मोर्चेबांधणी; आनंदीबेन यांच्या कन्येवर आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत सरकारची अडवणूक करण्यासाठी सोनिया व राहुल गांधी यांना जबाबदार धरल्यानंतर आता काँग्रेसने अर्थसंकल्पीय अधिवेशन ठप्प करण्यासाठी अनेक मुद्यांची जुळवाजूळव केली आहे. मोदी मुख्यमंत्री असताना तत्कालीन महसूल मंत्री आनंदीबेन पटेल यांच्या कन्या अनार यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीला सरकारी जमीन मातीमोल भावाने विकल्याचा आरोप काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केला होता. याच मुद्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवडय़ात कामकाज ठप्प करण्याची तयारी काँग्रेस नेत्यांनी सुरू केली आहे. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही रणनिती निश्चित होत आहे. याशिवाय राहुल गांधी यांचे निकटवर्तीय व माजी आयएएस अधिकारी के. राजू यांना रोहित वेमुला प्रकरण तसेच दलितांसाठी काँग्रेसने केलेल्या योजनांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी राहुल यांनी सोपवली आहे. ही माहिती अधिवेशन काळात खासदारांना पुरवण्यात येईल.
नरेंद्र मोदी यांनी थेट गांधी परिवारालाच लक्ष्य केल्याने आता काँग्रेस नेते संतापले आहेत. दलितांवरील अत्याचाराविरोधात काँग्रेस नेते विरोधी पक्षाच्या खासदारांसह अधिवेशन काळात संसद आवारातील गांधी पुतळ्याजवळ निदर्शने करण्यावर काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. मोदी यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळात अनार यांच्याशी संबधित कंपनीला अडीचशे एकर जागा केवळ साठ हजार प्रति एकर दराने दिली. या जागेची किंमत सुमारे १२५ कोटी रूपये असल्याचा आरोप करीत आनंद शर्मा यांनी थेट मोदींवरच आरोप केला. अर्थात हे प्रकरण राज्य सरकारशी संबधित असल्याने लोकसभा अध्यक्ष आमचे म्हणणे ऐकून घेणार नाहीत, असे एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने सांगितले. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री आता पंतप्रधान असल्याने त्यांच्याकडून काँग्रेस नेते स्पष्टीकरण मागणार आहेत.
माजी केंद्रीय मंत्री कुमारी सैलजा यांना गुजरातमधील एका मंदिरात जात विचारल्याच्या आरोपावर भाजप नेत्यांनी गुजरातमधील त्या मंदिराच्या अभ्यागत वहीतील नोंदीची प्रतच सभागृहात सादर केली होती. तेव्हा भाजप नेत्यांना हा विषय राज्याशी संबधित असल्याचे वाटले नाही का, असा प्रश्न काँग्रेसकडून उपस्थित करण्यात येणार आहे. सभागृहात भाजपने केलेली रणनितीच त्यांच्याविरोधात वापरणार असल्याचे काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

 

Story img Loader