भाजपाप्रणित एनडीएला आव्हान देण्यासाठी विरोधकांची मोट बांधली जात आहे. देशभरातील २६ विरोधी पक्ष एनडीएविरोधात आतापर्यंत एकत्र आले आहेत. विरोधकांच्या या आघाडीला I.N.D.I.A. असं नाव देण्यात आलं आहे. इंडिया आघाडीतले नेते एका बाजूला आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्याचे दावे करत असताना दिल्लीत मात्र इंडिया आघाडीच्या बुरुजाला तडा जाऊ लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाची एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल आणि इतर वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार या बैठकीनंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सांगितलं की, त्यांचा पक्ष दिल्लीतल्या लोकसभेच्या सर्व जागा लढवणार आहे. दिल्लीत लोकसभेच्या एकूण ७ जागा आहेत. तसेच राजधानीत तीन प्रमुख पक्षांचं वर्चस्व आहे. त्यात भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचा समावेश आहे. परंतु, आम आदमी पार्टीला डावून काँग्रेस सर्व जागांवर निवडणूक लढणार असल्याने इंडिया आघाडीला तडा जाऊ लागल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसचा हा निर्णय आघाडीसाठी मोठा धक्का आहे.
दिल्लीत आम आदमी पक्षाबरोबर आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर काँग्रेस नेते अनिल चौधरी म्हणाले, काँग्रेस पक्ष सध्या संघटना मजबूत करून लढणार आहे. आम आदमी पार्टी किंवा युतीबाबत आमची चर्चा झाली नाही. आम्ही आमचा स्वतःचा रस्ता निवडला आहे.
अरविंद केजरीवाल सरकारची खरी धोरणं एक्सपोज करण्यासाठी आम्ही पोलखोल यात्रेतून सर्वतोपरी प्रयत्न केले. मद्य घोटाळ्यापासून ते त्यांच्यावर झालेल्या अनेक कारवाया या आमच्या लोकांनी केलेल्या तक्रारींवरून झाल्या आहेत. २०२४ मध्ये आम्ही लोकसभा निवडणूक जिंकू. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल हे २०२५ मध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री होणार नाहीत, असा आमचा प्रयत्न असेल.
हे ही वाचा >> “…अन् अजित पवार टुणकन तिकडे गेले”; राज ठाकरेंचा टोला, म्हणाले, “पंतप्रधानांनी…”
काँग्रेस नेत्या अलका लांबा म्हणाल्या, दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, दीपक बाबरिया यांच्या उपस्थितीत तब्बल तीन तास आमची बैठक पार पडली. या बैठकीत आम्हाला दिल्लीतल्या लोकसभेच्या सर्व सात जागांवर लढण्याची तयारी करायला सांगितलं आहे. आम्ही या सर्व जागांवर निवडणूक लढणार आहोत. निवडणुकीला केवळ सात महिने बाकी असून सर्व कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.