पीटीआय, नवी दिल्ली/जयपूर : काँग्रेसच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळय़ात पडणार आणि अशोक गेहलोत पक्षाध्यक्ष झाल्यास राजस्थानचे मुख्यमंत्री कोण होणार हे गूढ अद्याप कामय आहे. गेहलोत दिल्लीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ते अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार की अन्य कुणाला पक्षश्रेष्ठींची पसंती मिळणार, याची उत्सुकता ताणला गेली आहे.

‘‘मुख्यमंत्री हे पक्षाच्या १०२ आमदारांचे पालक आहेत. या आमदारांच्या भावना ते दिल्लीला जाऊन पक्षनेतृत्वाच्या कानावर घालतील,’’ असे गेहलोतांचे समर्थक असलेले राजस्थानचे मंत्री प्रतापसिंह खचारियावास म्हणाले. गेहलोत अध्यक्षपद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याबाबत  पक्षनेतृत्वाचा निर्णय घेईल, मात्र ते आताच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याचेही खचारियावास यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दिल्लीला निघण्यापूर्वी गेहलोत यांनी सोनिया गांधींशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली. समर्थक आमदारांनी आपल्या अपरोक्ष दुसरी बैठक बोलावली असून जयपूरच्या घटनांमध्ये आपला हात नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल, तो मान्य असेल असेही त्यांनी सांगितल्याचे समजते.

दुसरीकडे पक्षश्रेष्ठींनी अध्यक्षपदासाठी अन्य नावांचाही विचार सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खरगे यांच्यासह दिग्विजय सिंह, कमलनाथ, ए के अँटोनी, अंबिका सोनी, पवनकुमार बन्सल, प्रियंका गांधी ही नावेदेखील चर्चेत आली आहेत. ‘‘पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडेन’’ असे सांगत खरगे यांनी स्वत: इच्छुक असल्याचे स्पष्ट केले. तर कमलनाथ यांनी मात्र मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करायचे असल्यामुळे पक्षाध्यक्ष होण्यात रस नसल्याचे जाहीर केले. राजस्थानातील पेच आणि पक्षाध्यक्ष निवडणुकीबाबत सोनिया गांधींनी देशभरातील ज्येष्ठ नेत्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे.

गेहलोत यांचा पत्ता कट?

अशोक गेहलोत यांना पक्षाध्यक्ष होण्यासाठी काँग्रेस नेतृत्वाची सर्वाधिक पसंती होती. मात्र राजस्थानात घडलेल्या घटनांमुळे सोनिया गांधी आपला विचार बदलण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अद्याप गेहलोत यांचे नाव पूर्णपणे मागे पडले नसले, तरी पक्षाने अन्य नावांवर विचार सुरू केल्यामुळे त्यांचा पत्ता कापला जाऊ शकतो. अर्ज भरण्याची मुदत शुक्रवारी संपणार असल्यामुळे गुरूवारी काँग्रेसमध्ये मोठय़ा राजकीय घडामोडी घडू शकतात.

उमेदवारी अर्जाआधी थरूर यांची शायरी!

काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ‘ट्विट’वर शेर प्रसृत केला. त्याद्वारे आपल्या उमेदवारीला पाठिंबा वाढत असल्याचा दावा त्यांनी अप्रत्यक्षरीत्या केला. त्यांनी प्रसिद्ध गीतकार व शायर मजरूह सुलतानपुरी यांचा प्रसिद्ध शेर ‘मैं अकेलाही चला था जानिब-ए-मंजलि, मगर लोग साथ आते गए और कारवां बनता गया।’ ही शायरी ट्वीट केली.  थरूर ३० सप्टेंबर रोजी सकाळी अकराला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार २२ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसृत करण्यात आली असून, २४ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ती ३० सप्टेंबपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होईल आणि १९  ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल.

Story img Loader