काँग्रेसच्या अध्यक्षपद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताच ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. थरुर यांच्या निवडणूक जाहीरनाम्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या जाहीरनाम्यात भारताचा नकाशा चुकीचा दाखवल्यानंतर भाजपाने शशी थरुर यांच्यावर निशाणा साधला आहे.
शशी थरुर यांच्या निवडणूक जाहीरनाम्यातील नकाशात जम्मू काश्मीर आणि लडाख हा भाग वगळण्यात आला होता. भारताच्या चुकीच्या नकाश्यामुळे खळबळ उडाल्यानंतर थरुर यांच्या कार्यालयाने या नकाशात सुधारणा केली आहे. “काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार शशी थरुर यांनी भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केला. एकिकडे राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रा करत असतानाच काँग्रेस उमेदवार भारताचे तुकडे करण्याच्या विचारात आहेत. असे केल्यास गांधींची मर्जी राखण्यास मदत होईल, असे कदाचित त्यांना वाटत असेल”, असे भाजपा नेते अमित मालवीय म्हणाले आहेत.
Congress President Election: शशी थरुर यांना जी-२३ नेत्यांचा विरोध? थरुर म्हणाले, “मी या निवडणुकीत…”
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करताच थरुर यांनी मोठं विधान केले आहे. “काँग्रेसमधील हायकमांड संस्कृतीमध्ये बदल करू” असे दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना थरुर यांनी स्पष्ट केले आहे. शशी थरुर यांच्या उमेदवारीला जी-२३ नेत्यांचा विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पक्षांतर्गत निवडणूक आणि काही सुधारणांची मागणी करणाऱ्या जी-२३ नेत्यांमध्ये थरुर यांचादेखील समावेश आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी गांधी कुटुंबियांचा ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांना पाठिंबा असल्याची चर्चा आहे. जी-२३ नेत्यांनीही खर्गे यांना समर्थन दिले आहे.