काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. २४ वर्षांनंतर काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष लाभले आहेत. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी ७ हजार ८९७ मतं मिळवत प्रतिस्पर्धी ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांचा पराभव केला आहे. थरुर यांना १ हजार ७२ मतं मिळाली आहेत. या पराभवानंतर शशी थरुर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “खरगेंचा विजय काँग्रेस पक्षाचा विजय आहे. ही निवडणूक कधीच व्यक्तीसाठी नव्हे पक्षासाठी होती. काँग्रेस पक्ष मजबुत होणं देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे”, असे थरुर यांनी म्हटले आहे.
शशी थरुर यांनी मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी भेट देत त्यांचे विजयासाठी अभिनंदन केले. “ते पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी नेहमीच पक्षाला मार्गदर्शन केले आहे. १ हजार प्रतिनिधींनी मला मतदान केलं याबाबत मी आनंदी आहे. आमचे कार्यकर्ते पक्षाचा खरा अभिमान आहेत”, असे थरुर यांनी म्हटले आहे. “काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बननं ही एक मोठी सन्मानाची बाब आहे. पण त्यासोबतच ती एक मोठी जबाबदारीही आहे. माझी इच्छा आहे की मल्लिकार्जुन खरगेंना यामध्ये यश मिळावं. मला मत देणाऱ्या एक हजाराहून अधिक काँग्रेसजनांचे मी आभार मानतो”, असं आपल्या ट्वीटमध्ये शशी थरूर म्हणाले आहेत.
काँग्रेसला तब्बल दोन तपांनंतर मल्लिकार्जुन खरगेंच्या रुपाने गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती अध्यक्ष म्हणून लाभली आहे. याआधी सीताराम केसरी यांनी १९९६ ते १९९८ या काळात काँग्रेसचं अध्यक्षपद भुषवलं होतं. त्यांच्यानंतर सोनिया गांधींनी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर शशी थरुर यांच्या गटातून निवडणूक प्रक्रियेबाबत काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान उत्तर प्रदेशात गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांच्या समर्थकांनी केला आहे. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना लिहिलेल्या पत्रात शशी थरुर यांचे निवडणूक प्रभारी सलमान सोझ यांनी ही तक्रार केली आहे. उत्तर प्रदेशात झालेली निवडणूक प्रक्रिया विश्वासाहर्ता आणि मुल्यांना धक्का पोहोचवणारी असल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.