काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. “माझं काँग्रेससाठी एक ध्येय आहे. याबाबत सर्व प्रतिनिधींचा पाठिंबा घेण्याचा माझा प्रयत्न असेल. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आवाज होण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे”, असे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर थरुर म्हणाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी दिल्लीत दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली. दरम्यान, आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गेही निवडणुकीच्या रिंगणात दाखल झाले आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी निवडणुकीतून माघार घेत मल्लिकार्जून खर्गेंना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता थरुर विरुद्ध खर्गे अशी थेट लढत होणार आहे.

Congress President Election : मल्लिकार्जुन खर्गेंचं नाव पुढे येताच दिग्विजय सिंह बॅकफूटवर?

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पक्ष नेतृत्वाची सर्वाधिक पसंती होती. मात्र, मुख्यमंत्रीपदावरुन राजस्थानातील आमदारांच्या नाराजीनाट्यानंतर गेहलोत यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींच्या भेटीनंतर निवडणुकीतून माघार घेतली. राजस्थानातील आमदारांच्या बंडाची मुख्यमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी घेत त्यांनी सोनिया गांधींची माफीदेखील मागितली.

काँग्रेसने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. १ ऑक्टोबरला उमेदवारी अर्जाची छाननी होईल तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ८ ऑक्टोबर असेल. याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. बिनविरोध निवडणूक न झाल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. १९ ऑक्टोबरलाच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

Story img Loader