काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या १७ ऑक्टोबरला होणार आहे. याबाबतची अधिसुचना २२ सप्टेंबरला जारी करण्यात येणार आहे. तर मतमोजणी १९ ऑक्टोबरला पार पडणार आहे. ‘पीटीआय’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचं राजीनामा सत्र सुरू असताना ही निवडणूक घोषित करण्यात आली आहे.

“राहुल गांधींची अपरिपक्वता, बालिशपणा…,” राजीनामा पत्रात गुलाम नबी आझाद यांचे गंभीर आरोप; जाणून घ्या सहा महत्त्वाचे मुद्दे

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबरदरम्यान राबवली जाणार आहे. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी ही माहिती दिली आहे. निवडणुकीचे वेळापत्रक एकमताने मंजूर करण्यात आल्याचे काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. दरम्यान, खासदार राहुल गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावं, अशी विनंती ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. हे वैयक्तिक मत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

गुलाम नबी आझाद भाजपासोबत जाणार? मोदींचं ‘ते’ विधान चर्चेत; म्हणालेले, “माझे दरवाजे तुमच्यासाठी कायमच उघडे असतील, मी यापुढेही…”

जम्मू-काश्मीरमधील पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकताच काँग्रेसला रामराम ठोकला आहे. प्राथमिक सदस्यत्वासोबतच सर्व पदांचा आझाद यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या पाठोपाठ तेलंगणामधील काँग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते एम. ए. खान यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या दोन्ही नेत्यांनी पक्ष सोडताना काँग्रेस खासदार राहुल गांधीवर निशाणा साधला आहे. “राहुल गांधींची विचारसरणी अत्यंत वेगळी आहे. ती विचारसरणी पक्षातल्या ब्लॉक पातळीपासून बूथ पातळीपर्यंत कुणाशीच जुळत नाही”, असं खान यांनी म्हटलं होतं. तर राहुल गांधी अपरिपक्व आणि बालिश आहेत, असा शाब्दिक हल्ला काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या नाराजी पत्रात गुलाम नबी आझाद यांनी केला होता.