पीटीआय, नवी दिल्ली
केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग उद्ध्वस्त केल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी केला. या सरकारच्या काळात सार्वजनिक उद्योगांतील लाखो नोकऱ्यांची युवकांची संधी सरकारने हिसकावली आहे. या सरकारच्या काळात कंत्राटी नोकऱ्यांचे प्रमाण का वाढले, असा सवालही त्यांनी केला.
हिंदूीतून केलेल्या ‘ट्वीट’मध्ये खरगे यांनी नमूद केले की, मोदीजी लाखो सरकारी नोकऱ्यांची संधी संपवणे कोणत्या उपाययोजनांचा भाग आहे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे हे मोदी सरकारला मान्य नाही का, मोदी सरकारने सात सार्वजनिक उद्योगांतील तीन लाख ८४ हजार नोकऱ्यांच्या संधी संपवल्या आहेत. या काळात सरकारी क्षेत्रात कंत्राटी नोकऱ्या ८८ टक्क्यांनी का वाढल्या, ‘मेक इन इंडिया’चा जोरदार प्रचार ते केवळ आपली प्रतिमा उजळवण्यासाठी होता. त्यातून देशाला काय मिळाले, असे सवाल खरगे यांनी विचारले.