Ram Temple : राम मंदिरात राम मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने तयारी सुरु झाली आहे. अयोध्येत अत्यंत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरुन राजकारणही सुरु झालं आहे. अशात आता सोनिया गांधी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार का? याची चर्चा रंगली आहे. कारण काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. जयराम रमेश यांनी ही माहिती दिली आहे. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
काँग्रेसला निमंत्रण
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या सोहळ्याचं निमंत्रण सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना मिळालं आहे. या सोहळ्याचं निमंत्रण कुणालाही मिळणार नाही हा भाजपाचा इव्हेंट आहे अशी चर्चा सुरु असतानाच काँग्रेसला या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं आहे. आम्ही या निमंत्रणावर निर्णय घेऊ असं काँग्रेसने म्हटलं आहे.
हे पण वाचा- “सीता मातेने शाप मागे घेतला त्यामुळेच…”, अयोध्येचे राजे बिमलेंद्र मिश्रांचं वक्तव्य चर्चेत
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतले पक्षाचे मुख्य नेते अधीर रंजन चौधरी या तिघांनाही राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे. आता सोनिया गांधींसह हे दोन नेते राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थित राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. २२ जानेवारीलाच तुम्हाला याविषयी समजेल असं केसी वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे.
राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी डाव्या विचारसरणींच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र त्यांनी या सोहळ्याला येण्यास नकार दिला आहे. आता सोनिया गांधी या विषयी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.