‘प्रत्यक्षात येऊ शकतात, अशीच आश्वासने द्या’, अशी सूचना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकमधील काँग्रेस नेत्यांना दिली. यावरून आता पंतप्रधान मोदी आणि खरगे यांच्यात सोशल मीडियावरून खडाजंगी सुरू आहे. खरगेंच्या विधानाचा हवाला देऊन पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीका केली. “काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यांच्याकडून कधीही पूर्ण न होणारी आश्वासने दिली जातात. हे आता लोकांसमोर उघड झाले आहे”, अशी टीका पंतप्रधान मोदींनी एक्सवरील पोस्टमध्ये केली. त्यानंतर खरगेंनीही एक्सवर पोस्ट करून या टीकेला उत्तर दिले. पंतप्रधान मोदींनी प्रसिद्धीसाठी हलक्या दर्जाचा पीआर स्टंट केल्याचे खरगे म्हणाले.
वाद कसा सुरू झाला?
मल्लिकार्जुन खरगेंनी स्वपक्षातील नेत्यांचे कान टोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही संधी साधत काँग्रेसवर टीका केली. एक्सवर पोस्ट टाकत ते म्हणाले, “काँग्रेस पक्षाला आता कळून चुकले आहे की, अवाजवी आश्वासने देणे सोपे आहे, पण त्याची अंमलबजावणी करणे कठीण आहे. प्रत्येक निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसकडून अवाजवी आश्वासने दिली जातात, काँग्रेसलाही माहितीये की, ही आश्वासने वास्तवात येणार नाहीत. काँग्रेस लोकांसमोर अतिशय वाईट पद्धतीने उघडी पडली आहे.”
हे वाचा >> पाच वर्षांत मंत्र्यांच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ, वाचा कोणत्या मंत्र्यांची संपत्ती किती वाढली?
कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह घेतलेल्या पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “तुम्ही कर्नाटकात पाच गॅरंटी दिल्या. तुमच्याकडे पाहून आम्हीही पाच आश्वासने देऊ केली. आता तुम्ही यापैकी एक आश्वासन मागे घेणार असल्याचे मी वर्तमानपत्रात वाचले. तुम्ही वर्तमानपत्र वाचत नसाल. पण मी वाचतो.”
याचाच आधार घेऊन पंतप्रधान मोदींनी म्हटले की, आज काँग्रेसची सत्ता असलेले कोणतेही राज्य बघा. हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणामधील विकासाचा वेग मंदावला आहे. आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यांनी आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. हा एकप्रकारे त्या राज्यातील जनतेचा विश्वासघात आहे.
हे ही वाचा >> सर्वपक्षीय बंडखोरांचा सुळसुळाट; भाजपाला सर्वाधिक फटका, मविआ-महायुतीची रणनीती काय?
खरगेंचा पलटवार, जुन्या आश्वासनाची करून दिली आठवण
पंतप्रधान मोदींच्या हल्ल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनीही त्यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, एनडीए सरकारने पहिल्या १०० दिवसांची जी योजना आखली होती. तो अतिशय हलक्या दर्जाचा पीआर स्टंट होता. एनडीए सरकार सर्वात खोटारडे, फसवणूक करणारे, लुटणारे आणि प्रसिद्धीसाठी हपापलेले सरकार आहे.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, भाजपाच्या इंग्रजी आद्याक्षरातील बी म्हणजे बेट्रायल (विश्वासघात) आणि जे म्हणजे जुमला आहे. पंतप्रधान मोदींनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आतापर्यंत सात वेळा पाळलेली नाहीत, अशीही आठवण खरगे यांनी करून दिली. अच्छे दिन, दोन कोटी रोजगार, विकसित भारत, ही आश्वासने फोल गेलेली आहेत.