नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड हेच सरकारचे प्रमुख प्रवक्ते आहेत, असा हल्लाबोल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी ‘इंडिया’ आघाडीच्या पत्रकार परिषदेत केला. भाजपने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या शेतकरी पुत्राचा विरोधक अपमान करत असल्याचा आरोप भाजपने केला.
धनखड यांच्याविरोधात ‘इंडिया’ आघाडीने अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली आहे. ‘धनखड यांच्या गेल्या तीन वर्षांतील पक्षपाती वागणुकीमुळे आम्हाला त्यांच्याविरोधात प्रस्ताव आणावा लागला आहे. या प्रस्तावाला धनखड जबाबदार आहेत’, अशा शब्दांत खरगे यांनी प्रस्तावाचे समर्थन केले. धनखड यांचे पक्षपाती वर्तन घटनाविरोधी आहे असा आरोप विरोधकांनी केला. राज्यसभेतील विरोधी पक्षांच्या ६० हून अधिक सदस्यांनी प्रस्तावाच्या नोटिशीवर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये काँग्रेससह तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट, द्रमुक, डावे पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, झारखंड मुक्ती मोर्चा आदी ‘इंडिया’ आघाडीच्या खासदारांचा समावेश आहे.
‘राज्यसभेत धनखड यांच्या वर्तनामुळे सर्वात जास्त गोंधळ होतो. तेच सभागृहातील मोठे गोंधळी आहेत. सभागृहात धनखड सातत्याने सत्ताधारी (पान १० वर)(पान १ वरून) सदस्यांना बोलण्याची संधी देतात. त्यांचे वर्तन पूर्णपणे पक्षपाती आहे. विरोधी पक्षाने महत्त्वाच्या प्रश्नांवर केलेली चर्चेची मागणी धुडकावली जाते, त्या वेळी धनखडांना नियमांची आठवण होते. पण, सत्ताधाऱ्यांना बोलण्यासाठी कोणतेही नियम लागू होत नाहीत. विरोधकांना बोलण्यापासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार जाणीवपूर्वक असतो. धनखडांचे निर्णय सत्ताधारी पक्षाच्या बाजूने झुकलेले असतात. सभापती या नात्याने त्यांनी संविधान व संविधानाच्या परंपरांचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित असते’, अशी टीका खरगे यांनी केली.
सत्ताधाऱ्यांनाच बोलण्याची संधी
सत्ताधारी सदस्यांना बोलण्याची पूर्ण संधी मिळते असा आरोप तृणमूल काँग्रेसच्या नदीमुल हक यांनी केला. आमचा आवाज ऐकला जात नाही अशी टीका द्रमुकचे थिरुची सिवा यांनी केली. सभापती हे संसद नव्हे तर, सर्कस चालवत असल्यासारखे वाटते अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली. बोलण्यासाठी तेच वेळ घेतात असा आरोपही राऊत यांनी केला. राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा व अन्य नेते यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा : “सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर
विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न – भाजप
गांधी-नेहरू कुटुंबाचा उद्याोजक जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप भाजप संसदेत करत आहे. सोरोस फाऊंडेशनकडून निधी घेऊन देश अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी केला. यावरून लक्ष वळविण्यासाठी विरोधकांचा हा खटाटोप सुरु असल्याचा आरोपही पात्रा यांनी केला. त्यांची ही कृतीही जाट समुदायाचाही अपमान असल्याचा युक्तिवाद पात्रा यांनी केला. मात्र जाट समुदाय हा स्वाभिमानी असून, जनताच याला उत्तर देईल असे पात्रा यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर मतदान यंत्रांचा विषय वारंवार न्यायालयात नेण्याचा मुद्दाही दु:खद असल्याचे पात्रा यांनी नमूद केेले.
वैयक्तिक आकसापोटी धनखड यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणलेला नाही. लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्हाला हे पाऊल उचलावे लागले आहे. धनखडांपूर्वी सभापतींच्या आसनावर बसलेल्या पीठासीन अधिकाऱ्यांचे वर्तन निष्पक्ष होते. – मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते, राज्यसभा
© The Indian Express (P) Ltd