चंदीगड : भाजपचा ‘४०० पार’चा दावा मूर्खपणाचा असून पक्ष लोकसभा निवडणुकीत २०० जागांचा आकडा पार करू शकणार नाही, असे टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. अमृतसरमध्ये प्रसारमाध्यमांना संबोधित करताना खरगे म्हणाले की, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागा कमी होणार आहेत, तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीला फायदा होणार आहे.
हेही वाचा >>> मोदींकडून धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल; प्रियंका गांधीवढेरा यांची टीका
भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी लोकसभा निवडणुकीत ४०० हून अधिक जागा मिळवण्याचा दावा करत आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खरगे यांनी भाजपच्या अशा दाव्यांचा आधार काय असा सवाल केला. ‘‘जेव्हा तुमच्या (जागा) कमी होणार आहेत आणि आमच्या वाढणार आहेत अशा वेळी ‘४०० पार’चा दावा विसरा, तो दावा ‘बकवास’ आहे. ते सरकार बनवू शकत नाहीत आणि २०० जागांच्या पुढे जाणार नाहीत,’’ असे खरगे म्हणाले. ‘‘भाजपचे तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणामध्ये ‘अस्तित्व नाही’ आणि कर्नाटकात त्यांची स्थिती ‘मजबूत’ नाही. ते महाराष्ट्रात कमकुवत आहेत, तर पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये अटीतटीची लढत आहे. तर त्यांना ४०० जागा कशा मिळतील?’’ असा सवाल खरगे यांनी विचारले. निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवानंतर खरगे ‘त्यांची नोकरी गमावतील’ या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या टोमण्याला उत्तर देताना खरगे म्हणाले, ‘‘मी राजकारणात नोकरीसाठी नाही, तर लहानपणापासून (लोकांची) सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. इथे आता मला तेवढीच वर्षे झाली आहेत जेवढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय आहे. ४ जूननंतर त्यांनी स्वत:च्या कामाचा विचार केला पाहिजे.’’