नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांच्या नावापुढे पसंतीची खूण करावी, असे आवाहन काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने केले आहे. पक्षाध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांच्या गटाने आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी हा निर्णय जाहीर केला. सोमवारी ही निवडणूक होत आहे. बुधवारी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होईल.

मतदारांनी मतदानपत्रिकेवरील उमेदवाराच्या नावापुढे मतदान करताना एक क्रमांक टाकावा, असे आधी ठरले होते. मात्र, या मतदानपत्रिकेवरील अनुक्रमानुसार पहिल्या क्रमांकावर मल्लिकार्जुन खर्गे व दुसऱ्या क्रमांकावर शशी थरूर यांचे नाव आहे. जर पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढे क्रमांक टाकून मतदान केल्यास गोंधळात भर पडेल व दोन क्रमांकावरील थरूर यांना फटका बसू शकतो, अशी शक्यता थरूर गटाने व्यक्त केली होती.

मिस्त्री यांनी मतदानासाठी एक क्रमांक लिहिण्याची तरतूद पक्षाच्या घटनेत असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यावर थरूर यांच्या गटाने  निदर्शनास आणून दिले, की दोनपेक्षा जास्त उमेदवार असतील तर तसे करणे योग्य ठरते. अखेर मिस्त्री यांनी थरूर गटाचे म्हणणे मान्य करत रविवारी दुपारी त्यांच्या गटाला कळवले, की उमेदवारांच्या नावापुढे एक क्रमांकाऐवजी पसंतीची खूण करावी, असे मतदारांना कळवण्यात आले आहे. इतर कोणतेही चिन्ह किंवा क्रमांक टाकल्यास ते मत अवैध ठरेल, असे मिस्त्रींनी मतदारांना कळविले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

थरूर यांच्या गटाने ही निवडणूक असंतुलित पातळीवर होत असल्याचे व केंद्रीय निवडणूक समितीच्या निर्देशांचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा याआधी उपस्थित केला होता. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उघडपणे खर्गे यांना पािठबा देत असल्याचा  मुद्दाही थरूर गटाने उपस्थित केला होता.