काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे आणि शशी थरुर यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान, शशी थरुर यांनी ‘अधिकाराचे विकेंद्रीकरण’ करण्यासंबंधी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता खरगे यांनी त्यांच्यासोबत आपली तुलना करु नका असं सांगितलं आहे. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत खरगे यांनी हे आवाहन केलं आहे. यावेळी त्यांनी शशी थरुर यांच्या जाहीरनाम्यावर भाष्य केलं.

शशी थरुर यांनी जाहीरनाम्यात पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये अनेक बदल करण्याचं आश्वासन दिलं आहे. याबद्दल विचारण्यात आलं असता खरगे म्हणाले “मी ब्लॉक अध्यक्षापासून ते या पदापर्यंत मेहनत करुन पोहोचलो आहे. त्यावेळी शशी थरुर तिथे होते का?”.

Congress Presidential Election: मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा खुलासा, म्हणाले “माझं नाव सोनिया गांधींनी…”

“शशी थरुर आपल्या जाहीरनाम्यासोबत पुढील वाटचाल करण्यास मोकळे आहेत. पण उदयपूरमध्ये करण्यात आलेल्या घोषणांची अंमलबजावणी हा त्यांचा प्रमुख अजेंडा आहे. मे महिन्यात करण्यात आलेल्या घोषणेत पक्षाने तीन मुद्द्यांवर भर दिला होता. यामध्ये जनमत, निवडणूक व्यवस्थापन आणि राष्ट्रीय प्रशिक्षण यांचा समावेश होता,” असं खरगे यांनी सांगितलं आहे. सर्व वरिष्ठ आणि तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच या घोषणा करण्यात आल्या होत्या असंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेससाठी शस्त्रक्रिया अपरिहार्य!

काँग्रेसला संकटातून बाहेर काढण्यासाठी तरुण चेहऱ्याची गरज असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “आपण एक संस्थेचे व्यक्ती असून पक्षामधील प्रत्येकाबद्दल माहिती आहे. जिथे गरज आहे तिथे त्यांच्या सेवेचा फायदा घेतला जाईल”.