पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (८ ऑगस्ट) शरद पवार आणि काँग्रेसवर टीका केली होती. काँग्रेसने शरद पवारांना पंतप्रधान होण्यापासून रोखलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. त्यावर, ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी लालकृष्ण अडवाणी यांचाही उल्लेख केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“शरद पवारांना पंतप्रधान होण्यापासून काँग्रेसने रोखलं, म्हणून तुम्ही त्यांचा पक्ष फोडलात का?” असा प्रतिसवाल संजय राऊतांनी विचारला. “शरद पवारांविषयी एवढा आदर आहे म्हणून पक्ष फोडलात का?” शरद पवार आणि काँग्रेस हे त्यांचं वेगळं राजकारण आहे. आम्ही असं म्हणतो लालकृष्ण अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून पंतप्रधानांनी रोखलं, किंवा त्यांना संघात घ्यायला लावलं. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तसंच, शरद पवार आणि काँग्रेस हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे”, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं. आज ते दिल्लीत प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा >> “बळीराजावर उद्ध्वस्त होण्याची वेळ आली, पण मौनीबाबा…”; महागाई, अन्नधान्याच्या तुटीवर ठाकरे गटाची केंद्रावर टीका

युती तुटल्याचा फोन एकनाथ खडसेंनी केला होता

“२०१४ साली शिवेसनेची साथ कोणी आणि का सोडली हे अख्ख्या देशाने पाहिलं. आपली युती तुटली आपण वेगळे झाले आहोत, असं भाजापाकडून अधिकृतपणे एकनाथ खडसे यांनी फोन करून उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं”, असंही संजय राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते?

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसच्या घराणेशाहीच्या राजकारणामुळे पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं असल्याचे वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही पंतप्रधानांनी ही टिप्पणी केली होती.

नरेंद्र मोदी घेतात सामनाची दखल – राऊत

सामनातील भूमिका या शिवसेनेच्या अधिकृत भूमिका आहेत. पंतप्रधांनाना सामनावर आणि शिवेसनेच्या भूमिकेवर खासदारांच्या बैठकीत चर्चा करावी लागते. कारण आम्ही ओरिजिनल आहोत. तुम्हाला याची दखल घ्यावी लागते कारण उद्धव ठाकरेंच्या भूमिका मान्य आहेत. कितीही हल्ले केले तरी सामना आणि शिवसेना शरण जात नाही, ही त्यांची वेदना त्यांनी बोलून दाखवली. ते नेहमीच सामना वाचतात आणि सामनाची दखल घेतात आणि सहकाऱ्यांनाही सांगतात की सामना माझ्यावर टीका करते, असंही संजय राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress prevented sharad pawar from becoming prime minister referring to lk advani sanjay raut said sgk
Show comments