विशिष्ट तांत्रिक बिघाडामुळे फेसबुकसह इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप या समाजमाध्यमांची जगभरातील सेवा सोमवारी (४ ऑक्टोबर) रात्रीपासून तब्बल सहा तासांसाठी खंडित झाली होती. खरंतर, अनेक तासांसाठी ठप्प झालेल्या सेवेमुळे सोशल मीडियावर विविध तर्क-वितर्कांना आणि चर्चांना उधाण आलं. नेमके हे अ‍ॅप्स अचानक बंद कसे काय झाले? याबाबत चर्चा झडू लागल्या, त्याचसोबत अनेक विनोदही केले गेले. मात्र, देशात आता याला राजकीय वळण मिळताना पाहायला मिळत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यानंतर अनेकांकडून यासाठी मोदी सरकारला दोषी ठरवलं गेलं. प्रियंका गांधींचं आंदोलन दडपण्यासाठीचं फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप बंद करण्यात आल्याच्या मोठ्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. अगदी कॉंग्रेसच्या खासदारांपासून ते ‘आप’च्या नेत्यांपर्यंत सर्वांनीच हा दावा केल्याचं पाहायला मिळत आहे.

“भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकतो”

काँग्रेसचे खासदार उदित राज यांनी याबाबतचं एक ट्विट केलं आहे. “असं दिसतंय की जणू केंद्र सरकारने फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम जाणीवपूर्वक बंद केलं आहे. प्रियांका गांधीजींची चळवळ दडपली जाईल, यासाठी हे करण्यात आलं”, असा दावा उदित राज यांनी केला आहे. तर, आम आदमी पक्षाचे आमदार सौरभ भारद्वाज यांनी देखील अशीच प्रतिक्रिया दिली आहे. “भाजप मंत्र्याच्या दुष्कर्माचा व्हिडिओ आल्यापासून फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप बंद झाले आहेत. भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकतो”, असं सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याबाबत सोमवारी दिवसभरात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा आरोप केला जात आहे.

काँग्रेस नेत्या पंखुरी पाठक म्हणाल्या की, “व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक यापूर्वी कधी इतका वेळ बंद होतं का? हे डाऊन झालं आहे की लखीमपूर शेतकरी नरसंहाराचं सत्य दडपण्यासाठी जाणीवपूर्वक केलं गेलं आहे?” नवीन व्हिडिओ व्हायरल होण्यापासून रोखण्यासाठी? असा सवाल उपस्थित करत पंखुरी पाठक आपल्या दुसऱ्या पोस्टमध्ये म्हणतात की, “वायफाय आणि मोबाईल इंटरनेटचा स्पीड देखील कमी करण्यात आला आहे. जिओ अनेक लोक वापरतात, तेही बंद करण्यात आलं आहे. टीव्हीनंतर आता या लोकांना इंटरनेटवरील बातम्या आणि माहितीवर देखील पूर्ण नियंत्रण हवं आहे. हे खूप धोकादायक आहे.”

इतकंच नव्हे तर कॉंग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख रोहन गुप्ता म्हणाले की, “व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राम इतक्या तासांसाठी बंद असणं हा योगायोग आहे की प्रयोग?”

प्रियांका गांधींनी सुरु केलं होतं उपोषण

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे रविवारी (३ ऑक्टोबर) आंदोलक शेतकऱ्यांच्या थेट अंगावर गाड्या नेल्याने घडलेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी रविवारी रात्री काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी लखीमपूर खेरीकडे जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना सीतापूर इथे रोखलं. तिथे त्या आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झडली. त्यानंतर अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्याविरोधात प्रियांका यांनी उपोषण सुरू केलं. याच सगळ्याचा संदर्भ लावून आता काँग्रेस आणि ‘आप’कडून हा दावा केला जात आहे.

Story img Loader