लखीमपूर हिंसाचार प्रकरणानंतर राजकीय वातावरण पेटलं आहे. या प्रकरणी विरोधी पक्षाने भाजपाला लक्ष्य करत अत्यंत आक्रमक भूमिका घेतलेली असताना काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि काँग्रेस नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांना कलम १५१ अंतर्गत अटक करण्यात आली आहे. प्रियांका गांधी रविवारी (३ ऑक्टोबर) रात्री उशिरा लखनऊहून लखीमपूर खेरीला रवाना झाल्या होत्या. पण पोलिसांनी त्यांना सीतापूरमध्ये ताब्यात घेतलं. दरम्यान, ताब्यात घेतल्यानंतर चक्क प्रियांका गांधी या डिटेन्शन रुममध्ये झाडू घेऊन साफसफाई करताना दिसल्या आहेत.

डिटेन्शन रूममध्ये केर काढतानाचा प्रियांका गांधी यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. खरंतर प्रियंका या लखीमपूरमधील हिंसाचारादरम्यान मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होत्या. यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आलं. सद्यस्थितीत प्रियांका यांनी कोठडीतच सत्याग्रह सुरू केला आहे. “मी शेतकऱ्यांना भेटल्याशिवाय इथून माघारी जाणार नाही”, असं निर्धार देखील यावेळी प्रियांका यांनी बोलून दाखवला आहे. दरम्यान, असाही आरोप होतं आहे की, पोलिसांनी प्रियांका गांधींना कायदेशीर मदत पोहोचू दिली नाही.

“वॉरंट तरी हवं ना?”

सोमवारी (४ ऑक्टोबर) सकाळी प्रियांका गांधींना हरगावजवळ पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं. यावेळी, प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेशच्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये मोठा वाद घातला. प्रियांका गांधी पोलिसांना म्हणाल्या की, तुम्ही मला ताब्यात घेऊ शकत नाही. तरीही जर तुम्ही मला वॉरंटशिवाय नेलं आणि धक्काबुक्की केलीत तर हे अपहरण, विनयभंग आणि हिंसाचाराचं प्रकरणात गणलं जाईल.

“आजच्या घटनेवरुन दिसून येत आहेत की हे सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी राजकारण करत आहे. हा शेतकऱ्यांचा देश आहे भाजपाचा नाही. पिडितांच्या नातेवाईकांना भेटून मी काही गुन्हा करत नाही. ते आम्हाला का अडवत आहेत? त्यांच्याकडे अटक करण्यासाठी वॉरंट तरी हवं ना?,” असे प्रश्न देखील प्रियंका यांनी उपस्थित केले आहेत.

…मग मला बेडया घालून घेऊन जा!

प्रियंका गांधी यांनी पोलिसांना सांगितलं की, “वरिष्ठ अधिकारी किंवा एखाद्या मत्र्यांकडून अटक वॉरंट आणा, दाखवा आणि मग मला बेडया घालून घेऊन जा. मी आनंदाने तुमच्यासोबत येण्यास तयार आहे.” त्यानंतर येथील पोलिस अधिकाऱ्यांनी महिला पोलिसांना पुढे केलं. त्यावर, प्रियांका गांधी संतापल्या. त्या म्हणाल्या, “महिलांना पुढे करू नका. मलाही कायद्याचं थोडंफार ज्ञान आहे. यूपीमध्ये कायद्याचं पालन केलं जात नसेल. परंतु. देशात कायदा आहे.”

Story img Loader