उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील जगदीशपुरा भागात पोलीस कोठडीत एका व्यक्तिचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र आता यानंतर येथील राजकारण तापायला सुरूवात झाल्याचे दिसत आहे. या व्यक्तीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आग्राकडे निघालेल्या काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस वे वर रोखलं व त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे यमुना एक्स्प्रेस वे च्या एंट्री पॉईंटवर पोलीस व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाल्याचे समोर आले.
प्रियंका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमकम झाले आहेत. पोलीस व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी सुरू झाल्याने, वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली . या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी पोलिसांकडून कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रियंका गांधी यांनी या घटनेच्या निषेधार्थ एक ट्विट देखील केलं आहे. “एखाद्याला पोलीस कोठडीत मारहाण करून ठार करणं कुठला न्याय आहे? आग्रा पोलीस कोठडीत अरूण वाल्मिकीच्या मृत्यूची घटना निंदनीय आहे. भगवान वाल्मिकी यांच्या जयंतीच्या दिवशी उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या संदेशाविरोधात काम केलं आहे. उच्चस्तरीय चौकशी व पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे आणि पीडित कुटुंबास भरपाई दिली जावी. असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.”
याप्रसंगी माध्यमांना प्रतिक्रिया देताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, “ ते म्हणातात मी आग्रा येथे जाऊ शकत नाही. मी जिथे मी जाते तिथे ते मला रोखतात. मी एका रेस्टॉरंटमध्ये बसून रहावं का? केवळ ते त्यांच्या राजकारणासाठी सोयीचं ठरेल म्हणून? मला त्यांची भेट घ्यायची आहे, यामध्ये एवढी काय मोठी गोष्ट आहे? ”
या अगोदर प्रियंका गांधी लखीपूर खेरी मधील हिंसाचारात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना भेटीसाठी जात होत्या, तेव्हा देखील त्यांना पोलिसांनी रोखल होत व नंतर ताब्यात देखील घेतलं होतं.