केंद्रीय लघु व मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद तिसऱ्या दिवशीही उमटले. ‘अशा संकुचित मनोवृत्तीच्या लोकांची आपण दखलही घेत नाही,’ असे सांगत सोनिया गांधी यांनी त्यांना ‘अदखलपात्र’ ठरविले असले, तरी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरुद्ध ठिकठिकाणी निदर्शने केली. दुसरीकडे गिरिराज यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने या प्रकरणावर आता पडदा पडला असल्याचा बचावात्मक पवित्रा भाजपने घेतला असला, तरी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकसमता पक्षाने गिरिराज यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. दरम्यान, बिहारमधील न्यायालयाने गिरिराज यांच्याविरुद्ध या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
बिहारमधील हाजीपूर जिल्ह्य़ातील एका विश्रामगृहात बोलताना गिरिराज सिंह यांनी, राजीव गांधी यांनी एखाद्या नायजेरियन महिलेशी लग्न केले असते आणि ती महिला ‘गोऱ्या कातडीची’ नसती, तर काँग्रेसने तिचे नेतृत्व स्वीकारले असते काय, असा प्रश्न विचारला होता. या वादग्रस्त वक्तव्याबद्दल त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राजधानी दिल्ली, तसेच बंगळुरू येथे निदर्शने केली. बंगळुरू येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. त्यासाठी आलेले भाजपचे नेते ज्या हॉटेलमध्ये उतरले आहेत, तेथून सुमारे एक किमी अंतरावर काँग्रेस व ‘एनएसयूआय’च्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत गिरिराज यांच्या प्रतिमेचे दहन केले. जयपूर व श्रीनगरमध्येही अशीच निदर्शने करण्यात आली.
रालोआत नाराजी
या प्रकरणी रालोआला घरचा आहेरही मिळाला आहे. रालोआचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते व केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांनी, अशा भाषेत बोलणे एका केंद्रीय मंत्र्याला शोभत नाही, असे सांगून गिरिराज यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा