पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी कर्नाटकमधल्या बांदीपूर आणि मुदुमलाई अभयारण्यात गेले होते. या ठिकाणी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टायगर सफारी केली. त्यानंतर त्यांनी मनसोक्त फोटोही काढले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या टायगर सफारीवर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच प्रोजेक्ट टायगरचं श्रेय माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना दिलं आहे.
जयराम रमेश यांनी काय म्हटलं आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी ५० वर्षांपूर्वीच्या प्रोजेक्ट टायगरचं पूर्ण श्रेय घेतील. तिथे जाऊन तमाशा करतील. खरंतर पर्यावरण, जंगल, वन्य जीव आणि वन क्षेत्रात राहणारे आदिवासी यांचं रक्षण यासंबंधीचे कायदे संपवले जात आहेत किंवा पायदळी तुडवले जात आहेत. मात्र मोदी आता सगळं श्रेय घेतील पण वास्तव वेगळं आहे.
काँग्रेसच्या विविध ट्वीटर हँडलवरून इंदिरा गांधींचे फोटो ट्वीट
याशिवाय कर्नाटक काँग्रेसच्या नेत्यांनी विविध ट्वीट केली आहेत. त्यात असं म्हटलं गेलं आहे की कायम हा प्रश्न विचारला जातो की ७० वर्षांमध्ये काँग्रेसने काय केलं? १९७३ मध्ये बांदीपूर प्रोजेक्टची सुरूवात ही इंदिरा गांधींच्या सरकारने केली आहे. आज जे टायगर सफारीचा आनंद घेत आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो की वाघांची संख्या वाढली आहे. तसंच बांदीपूर अभयारण्य अदाणींना विकू नका असाही टोला काही नेत्यांनी लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्याघ्र गणनेच्या अहवालाचं प्रकाशन
म्हैसूरच्या प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्याघ्र गणनेच्या अहवालाचं प्रकाशन केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी चामराजनगर जिल्ह्यातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. पंतप्रधान व्याघ्र संवर्धन कार्यात सहभागी असलेल्या फ्रंटलाइन फील्ड स्टाफ आणि स्वयं-सहायता गटांशी संवाद साधला. तसेच मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू येथील हत्ती कॅम्पलाही पंतप्रधान भेट दिली. तसंच तिथे त्यांनी फोटोही काढले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लुकचीही चर्चा झाली होती. आता काँग्रेस नेत्यांनी ट्वीट करत आता याचं श्रेय लुटा असा टोला लगावला आहे.