नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेत्यांच्या बैठकी वाढल्या आहेत. पक्षातील अनेक नेत्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत पक्षबांधणीची गरज बोलून दाखवली आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनीही पक्षातील संघटनात्मक कमकुवतपणा दूर करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तसेच त्यांनी काँग्रेस पक्ष २०२४ मधील लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेससोबत युती करण्यास तयार असल्याचं म्हटलंय.
एनडीटीव्हीशी बोलताना पी चिदंबरम म्हणाले की, “काँग्रेस २०२४ च्या लोकसभा निवडणुका तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि डीएमके सारख्या पक्षांसोबत युती करून लहान भाऊ म्हणून लढण्यासाठी सज्ज आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी त्यांचा पक्ष आवश्यक असल्यास तडजोडकरण्यास तयार आहे. ही तडजोड फक्त काँग्रेसच करेल असं नाही, तर प्रत्येक पक्षाला करावी लागेल. हे ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनाही लागू होते. हा लढा राज्या-राज्यात होणार आहे. बंगालमध्ये आपल्याला तृणमूलच्या नेतृत्वाखाली लढावं लागणार आहे. पंजाबमध्ये ‘आप’च्या नेतृत्वाखाली लढावं लागणार आहे. भाजपा विरोधात राज्या-राज्यात लढल्यास त्यांचा पराभव करणे शक्य आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“पाच राज्यांमध्ये निवडणुकीत झालेल्या पराभवाला केवळ गांधी कुटुंबाला जबाबदार धरणं योग्य नाही. पराभवानंतर सोनिया गांधी यांनी रविवारी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाच्या पदांचा राजीनामा देण्याची ऑफर दिली होती. परंतु कमिटीने हे मान्य केले नाही. आता आमच्याकडे कोणता पर्याय आहे? काँग्रेसच्या नवीन अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया वेगवान करण्याची गरज आहे. पण ते ऑगस्ट महिन्यात शक्य होईल,” असंही चिदंबरम म्हणाले.