पीटीआय, हैदराबाद : काँग्रेसने रविवारी पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांत निर्णायक जनादेश मिळण्याची ग्वाही देत या लढाईसाठी सज्ज असल्याचे सांगितले. काँग्रेसच्या पुनर्गठित कार्यकारी समितीच्या (सीडब्ल्यूसी) पहिल्याच दोन दिवसीय बैठकीनंतर पक्षाने हा निर्धार व्यक्त केला. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी समितीच्या विस्तारित बैठकीत वरिष्ठ पक्ष नेत्यांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून शिस्तबद्ध व एकजूट राखून पक्षाच्या यशाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. पक्षाचे नुकसान होईल असे कोणतेही काम करू नका, असा सडेतोड इशाराही त्यांनी दिला.
काँग्रेसच्या विस्तारित कार्यसमितीच्या बैठकीत तेलंगणासह पाच राज्यांच्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची रणनीती, संघटना मजबूत करणे आणि अन्य काही विषयांवर चर्चा करण्यात आली. पक्षाच्या पुनर्गठित कार्यकारी समितीची पहिली बैठक शनिवारी तर विस्तारित कार्यकारी समितीची बैठक रविवारी पार पडली. विस्तारित समितीत कार्यकारी समिती सदस्य, विशेष निमंत्रित, स्थायी निमंत्रित सदस्यांव्यतिरिक्त, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षाचे नेते, संसदीय पक्षाचे पदाधिकारी आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्यांचा समावेश असतो.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखिवदर सिंग सुखू रविवारी झालेल्या विस्तारित कामकाजाच्या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी बैठकीस संबोधित करताना खरगे यांनी काँग्रेस नेत्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करून देशात परिवर्तनाची चिन्हे दिसत असून कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल याचा पुरावा असल्याचे सांगितले.
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या मुद्दय़ावरून खरगे यांनी मोदी सरकारवर टीका केली. पक्षनेत्यांना उद्देशून ते म्हणाले, की ही वेळ आरामात बसण्याची नाही. दिवस-रात्र मेहनत करावी लागेल. शिस्तीशिवाय कोणीही नेता होत नाही. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १९५३ मध्ये हैदराबाद येथे दिलेल्या वक्तव्याचा संदर्भ दिला, ज्यामध्ये नेहरूंनी शिस्तीवर भर दिला होता.
बदलाचे सुतोवाच
विस्तारित कार्यकारी समितीच्या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावात देशवासीयांना बदल हवा असल्याचे नमूद केले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीवरही कार्यकारिणीने भर दिला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान आणि तेलंगणातील जनतेकडून यंदा काँग्रेसला निर्णायक जनादेश मिळेल असा पक्षाला विश्वास वाटत असल्याचेही ठरावात नमूद केले आहे. काँग्रेस आगामी लढाईसाठी पूर्ण सज्ज आहे. जनतेला बदल हवा असून आम्ही जनतेच्या कायदा-सुव्यवस्था, स्वातंत्र्य, सामाजिक-आर्थिक न्याय आणि समानतेच्या अपेक्षा पूर्ण करू. या बैठकीत तेलंगणावरही चर्चा करण्यात आली. काँग्रेस कार्यकारी समितीने केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) तेलंगणावासीयांचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. ‘सुवर्ण तेलंगणा’चे स्वप्न भंगल्याचे नमूद करून, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्यांचे कुटुंब निजामाप्रमाणे जुलमी राज्य करत असल्याचा आरोप केला.
१४ कलमी ठराव मंजूर
हैदराबादमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये शनिवारी काँग्रेस कार्यकारी समितीच्या अनेक तासांच्या बैठकीनंतर १४ कलमी ठराव मंजूर करण्यात आला, ज्यामध्ये महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची स्थिती, शेतकऱ्यांच्या समस्या, चीनसोबतचा सीमावाद, अदानी समूहाशी संबंधित गैरव्यवहार आदी अनेक समस्यांचा उल्लेख करण्यात आला.
भाजपच्या सापळय़ात अडकू नका : राहुल गांधी
शनिवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत वैचारिक स्पष्टतेवर भर देताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, की पक्षाच्या नेत्यांनी भाजपच्या खऱ्या मुद्दय़ांपासून लक्ष विचलित करण्याच्या सापळय़ात फसू नये. त्या वादात अडकण्याच्या फंदात पडू नये. काँग्रेस नेत्यांनी जनतेचे हित जपणाऱ्या मुद्दय़ांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.