जम्मू-काश्मीर विधानसभेच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने सत्तास्थापनेसाठी पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीला (पीडीपी) पाठिंबा देण्याची तयारी दाखविली आहे. जनतेने कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न दिल्यामुळे राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. पीडीपी आणि भाजप या दोन्ही पक्षांना जनतेचा कौल विभागून मिळाल्याने एकाही पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करता येणार नाही. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यासाठी इतर पक्षांची मदत घेणे अपरिहार्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी आम्ही पीडीपीला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सांगितले. काँग्रेसने यापूर्वीही पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांशी युती केली होती. मात्र, काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत भाजपशी युती करणार नसल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. यापूर्वी काँग्रेस आणि पीडीपी सत्तेत एकत्र होते, मात्र, अमरनाथच्या मुद्द्यावरून ही युती संपुष्टात आली होती.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुलाम नबी आझाद काँग्रेसचा मुख्य चेहरा होते. विधानसभेच्या निकालांवरून पीडीपी हा राज्यात सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरणार, हे स्पष्ट झाल्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी ही प्रतिक्रिया दिली. तब्बल २९ जागांवर आघाडीवर असणाऱ्या पीडीपीला सत्तास्थापनेसाठी काँग्रेस किंवा भाजपची मदत घेणे अपरिहार्य आहे.

Story img Loader