नवी दिल्ली: काँग्रेसकडे राजकीय विचार नाहीत. काँग्रेस राष्ट्रीय किंवा प्रादेशक पक्षही राहिलेला नाही, केवळ भावा-बहिणीचा पक्ष झालेला आहे. ५०-५० वर्षे पक्षामध्ये कार्यरत राहिलेले ज्येष्ठ नेते काँग्रेसला सोडून का जात आहेत? त्यामुळे काँग्रेसने ‘’भारत जोडो’’चा नारा देण्याआधी पक्ष जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शुक्रवारी हरियाणातील कार्यक्रमात केली.

काँग्रेसचा राजीनामा देताना गुलामनबी आझाद यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत टीका केली होती व पक्षामध्ये राहुल यांनी सल्ला-मसलतीची यंत्रणा नष्ट केली असल्याचा आरोप करून काँग्रेसमध्ये लोकशाही नसल्याचा दावा केला होता. आझादांच्या राजीनामापत्राच्या संदर्भात नड्डा यांनी, काँग्रेस हा एका कुटुंबाचा पक्ष झाला आहे. घराणेशाही असलेले काँग्रेससारखे पक्ष आपल्या कुटुंबाला, मुला-मुलींना, भाचे-पुतण्यांना, जावयांना (भ्रष्टाचारातून) वाचवण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत आहेत. जे पक्ष (काँग्रेस) भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचा आव आणत आहेत, तेच जामिनावर सुटलेले आहेत. त्यांच्याच पायात भ्रष्टाचाराच्या साखळय़ा असताना ते कसे लढणार, असा सवाल नड्डा यांनी उपस्थित केला.

ज्या राज्यांमध्ये काँग्रेस वा भाजपेतर पक्ष सत्तेवर राहिले, तिथे या सरकारांनी समाजात दुही माजवली. भावा-भावांना, प्रदेशां-प्रदेशांना एकमेकांविरोधात लढवले गेले, समाज जाती-जातींमध्ये, उच्चवर्णीय -मागासांमध्ये विभागण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातून लोकांचे काही भले झाले नाही. पण, केंद्रात आणि राज्यात भाजपचे डबल इंजिन सरकार असेल तर लोकांच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल, असे नड्डा म्हणाले.

‘घराणेशाहीतून खरी शिवसेना मुक्त झाली!’

नड्डा यांनी यापूर्वीही काँग्रेस व भाजपेतर प्रादेशिक पक्षांवर टीका केली होती व नजिकच्या भविष्यात भाजप हाच राष्ट्रीय पक्ष उरेल व अन्य पक्ष संपुष्टात येईल, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा नड्डा यांनी भाजपेतर पक्षांवर टीका केली आहे. भाजपची लढाई काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, तेलंगण राष्ट्र समिती आणि शिवसेनेसारख्या पक्षांशी आहे. हे सगळे घराणेशाही चालवणारे पक्ष असून आता अशा शिवसेनेतून खरी शिवसेना मुक्त झाली आहे, अशी मार्मिक टिप्पणी नड्डा यांनी केली.

Story img Loader